सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे येथील शिक्षकाच्या खूनाचा उलगडा अवघ्या २४ तासात पोलिसांनी केला आहे. या घटनेत जायखेडा पोलिसांनी सख्ख्या पुतण्याला अटक केली आहे. येथील उपक्रमशील प्राथमिक शिक्षक रमेश शिवराम भामरे वय ५७ यांचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला होता. पण, हा मृत्यू अपघाताने नव्हे तर घातपाताने झाल्याचे आता उघड झाले आहे.
ताहाराबाद पिंपळकोठे रस्त्यावर रमेश भामरे यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते. मात्र गेल्या अनेक वर्षापासून भामरे यांच्या भावबंधकीत जमिनीचे वाद सुरू होते. या वादामुळे त्यांचा अपघाताने मृत्यू झाला का घातपाताने झाला याबाबत त्यांच्या कुटुंबियांना संशय होता. याबाबत त्यांनी पोलिसांना तक्रार दिली. तक्रार प्राप्त होताच पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, पोलीस उपअधीक्षक पुष्कराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी त्यादिशेने तपास चक्र फिरवली. चोवीस तासात घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले, मयत रमेश भामरे यांचे सख्खे पुतणे सुजित सुनील भामरे यांना आरोपी म्हणून पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात भादवी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या सर्व घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, हवालदार गोपीनाथ भोये, सुनील पाटील, भगरे, जितेंद्र पवार यांनी केला.