सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ताहाराबाद-सोमपूर रस्त्यावर पायी चालणाऱ्या तिघांना क्रेनने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत. या गंभीर अपघातात पतीचे निधन झाले तर पत्नी आणि मुलगी जखमी झाली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ताहाराबाद येथील सब स्टेशन आदिवासी वस्तीतील रहिवाशी गोपा रामचंद्र पवार (वय ५५) हे पत्नी व मुलीसह गावाकडून किराणा करून परतत होते. ताहाराबाद सोमपूर रस्त्यावरील रामनगर जवळ मागून येणाऱ्या क्रेनने तिघांना धडक दिली. त्यात गोपा पवार यांचे निधन झाले. त्यांची पत्नी बायजाबाई गोपा पवार (वय ५०), मुलगी छाया गोपा पवार (वय १७) हे दोघे जखमी झाले आहेत. ताहाराबाद सोमपूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर झाडे झुडपे रस्त्यावर आली आहेत. यामुळे पदचारी यांना रस्त्यावरून चालतांना जीव मुठीत धरून चालावे लागते. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या साईड पट्ट्यांची साफसफाई झालेली नाही. प्रती वर्षी रस्त्याच्या दुरुस्ती कामी लाखो रुपये खर्ची घातले जातात मात्र हा खर्च फक्त कागदावरच राहात असल्याचे दिसते आहे.
या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाणही मोठ्या संख्येने वाढलेले आहे. ताहाराबाद सोमपुर रस्त्यावर मधुसुमन इंग्लिश मिडीयम स्कूल, ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूल, शिवशक्ती नगर, राम नगर, सबस्टेशन आदिवासी वस्ती, खांडसरी, गरमुड नाला भागात रहिवाशी वस्त्या आहेत. यामुळे शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थांची रस्त्यावरून रेलचेल सुरू असते. मात्र रस्त्याच्या साईड पट्ट्यांवर झाडा झुडपाचे अतिक्रमण झाल्याने पदचारी यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. रस्त्याच्या समस्येमुळे हा अपघात घडला असल्याने पुढील अनर्थ टाळण्यासाठी रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
ताहाराबाद सोमपूर रस्त्यावर पायी चालणाऱ्या ग्रामस्थ व विद्यार्थी वर्गाची संख्या मोठी असल्याने रस्त्यावरील साईड पट्ट्या दुरुस्त करणे गरजेचे आहे. मात्र संबंधित विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी, अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे यामुळे रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी.
– सचिन कोठावदे, संचालक, सटाणा मर्चंट को ऑप बँक
Taharabad Sompur Road Crane Accident 1 Death 2 Injured
Satana