नाशिक – अंबड लिंक रोडवरील सिम्बायोसिस महाविद्यालयाला गॅदरिंगचे आयोजन करणे महागात पडले आहे. नियमांचे उल्लंघन करीत गॅदरिंगमध्ये डीजे लावण्यात आल्याने अंबड पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळेच गॅदरिंगच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करत महाविद्यालय परिसरात डीजे वाजवून गॅदरिंगचे आयोजन केले म्हणून सिम्बॉयसिस महाविद्यालयाच्या आयोजकांवर कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांच्या परवानगीशिवाय कोणत्याही नियमांचे उल्लंघन होईल, अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यास बंदी आहे. तसे सक्त आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. असे असतानाही शहरासह सिडको परिसरात काही ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन होतांना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सिडकोतील अंबड लिंक रोड परिसरातील सिम्बायोसिस महाविद्यालयात दोन दिवसीय वार्षिक गॅदरिंगचे आयोजन करण्यात आले. बघा का कार्यक्रमाचा व्हिडिओ
https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/1140634786341226/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C
शुक्रवारी पहिल्या दिवशी सायंकाळी डीजेचा वापर करून गॅदरिंग मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. पोलीस आयुक्तांची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता सदर कार्यक्रम घेण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अंबड पोलिसांनी १८८ प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजक डॉ. रामकृष्ण मनतकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अंबड पोलिस करीत आहेत.