नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रशासनाच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा यशोत्सव म्हणून या योजनेचे लाभार्थी फेरिवाले आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी देशातील ७५शहरांमध्ये ‘स्वनिधीमहोत्सव’या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून महाराष्ट्रातील चार शहारांचा यात समावेश आहे. येथील नॅशनल मिडिया सेंटरमध्ये केंद्रीय गृह निर्माण व नगर विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी आज स्वनिधी महोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमाची घोषणा केली. मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी आणि अपर सचिव संजय कुमार यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील चार शहारांमध्ये आयोजन
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशातील ३३ राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ७५ शहरांमध्ये ९ ते ३१ जुलै २०२२ दरम्यान या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील चार शहारांमध्ये या महोत्सवाचे आयोजन होणार असून सर्वप्रथम १४ जुलै रोजी नाशिक मध्ये ,१६ जुलै रोजी कल्याण डोंबिवली,२२ जुलै रोजी मुर्तिजापूर ( जि. अकोला ) आणि २४ जुलैला नागपूर येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
असा साजरा होणार महोत्सव
या महोत्सवाअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांसह,डिजीटल घेवाण-देवाण विषयक प्रशिक्षण, ऋण मेळावा, फेरीवाले-रस्तयावरील विक्रेत्यांचा सत्कार, या विक्रेत्यांचे अनुभव कथन आणि या योजनेची माहिती व महत्व विषद करणारे नुक्कड नाटक यांचा समावेश असणार आहे.
कोविड-१९ महामारीमध्ये देशातील फेरिवाले,रस्त्यावरील विक्रेत्यांसमोर उभ्या ठाकलेल्या संकटातून बाहेर काढून त्यांना पुन्हा नव्याने व्यवसाय सुरु करता यावा, या उद्देशाने १ जून २०२० रोजी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची देशभर सुरुवात झाली.
Svanidhi Cultural Festival in 4 cities of Maharashtra