इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘देने वाला देता है, तो देता छप्पर फाडके!’, असे म्हणतात. एखाद्याचे नशीब खुलले किंवा उघडले तर त्याला प्रचंड फायदा होतो, जणू काही त्याची लॉटरी लागते. तो अत्यंत भाग्यवान असतो, असे म्हटले जाते. अमेरिकेतील एका विद्यार्थ्याचे बाबतीतही असाच किस्सा घडला शेअर बाजारात त्यांनी गुंतवणूक केली आणि एका शेअरमुळे त्याला प्रचंड अतिप्रचंड असा फायदा झाला आणि तो मालामाल झाल्याने आता पालकांना त्याबद्दल चिंता वाटू लागली आहे. जॅक फ्रीमॅन असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो २० वर्षांचा असून यूनिव्हर्सिटी ऑफ साउथ कैलिफोर्नियामध्ये तो शिकतो.
जॅक हा मॅथेमॅटिक्स अँड इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत आहे. त्याने शेअर बाजाराचा अभ्यास करून Bed Bath and Beyond या कंपनीचे शेअर्स विकत घेतले होते. या विद्यार्थ्याने शेअर बाजारात २१५ कोटी रुपये गुंतविले होते. १ महिन्यानंतर त्याने खरेदी केलेले सर्व शेअर्स विकले आणि त्याचे नशीब एवढे उघडले की, त्याला ८७९ कोटी रुपये मिळाले. म्हणजेच एका महिन्यात या तरुणाने ६६४ कोटी रुपयांची कमाई केली. या कमाईमुळे त्याच्या पालकांना आता त्याचे अपहरण वगैरे होईल की काय अशी चिंता सतावू लागली आहे.
दरम्यान, जॅकने जुलै महिन्यात ४४० रुपये प्रति शेअरच्या हिशेबाने ५० लाख शेअर खरेदी केले होते. यासाठी त्याला नातेवाईकांनी आणि मित्रांनी पैसे दिले होते. एका महिन्यात या शेअरची किंमत २१६० रुपयांपर्यंत गेली आणि जॅकला जॅकपॉट लागला. त्याने ते सर्व शेअर्स विकून टाकले.
गंभीर बाब म्हणजे गेल्याच आठवड्यातच कंपनीचा मालक आणि सीईओ गुस्तावो अर्नल याने आत्महत्या केली होती. इनसायडर ट्रेडिंगचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. कंपनीने काही नागरिकांच्या फायद्यासाठी धोकेबाजी केली आणि सामान्य नागरिकांचे ९६ अब्ज रुपयांचे नुकसान केले असा आरोप ठेवत त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. यामुळे अचानक या शेअरची किंमत ५६० रुपयांवर आली आहे. तसेच त्यापूर्वीच जॅकने ते शेअर्स विकल्याने फायद्यात आला आहे. त्या मालकाच्या आत्महत्येशी किंवा त्याच्या धोकेबाजीशी आपला काहीही संबंध नाही असा दावा जॅकने केला आहे. शेअरचा दर इतका पटकन वाढला की मलाही धक्का बसला. सुरुवातीला मी हा स्टॉक 6 महिन्यांसाठी विकत घेतला होता पण नंतर नफा दिसला आणि मी तो मुदतीपूर्वी विकला, असे त्याचे म्हणणे आहे.
Student Earn 664 Crore Money Investment Record