नाशिक – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर उत्साहात साजरा होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली व राज्य परिवहन संस्था महासंघाच्या सहकार्याने (ASRTU) देशातील ७५ प्रमुख बस स्थानकावर स्वातंत्र्य लढ्यातील आपल्या बलिदानाने अजरामर झालेले क्रांतिकारक, आपल्या असीम त्यागातून ब्रिटिशांच्या जोखंडातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वतंत्र सेनानी, स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील योगदानाचे सचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. नाशिक येथे हे प्रदर्शन नवीन मध्यवर्ती बस स्थानक येथे भरवण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख ८ शहरातील बसस्थानकावर (मुंबई सेंट्रल बसस्थानक, पुण्यातील स्वारगेट बसस्थानक, नाशिक मध्यवर्ती बसस्थानक, अमरावती मध्यवर्ती बसस्थानक, नागपूर मध्यवर्ती बसस्थानक, तारकपूर-अहमदनगर बसस्थानक, सोलापूर मध्यवर्ती बसस्थानक आणि कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावर) हे प्रदर्शन १३ ऑगस्ट पासून सर्व प्रवासी, नागरिक, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. तरी सर्वांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे.
आज नवीन मध्यवर्ती बस स्थानक नाशिक या ठिकाणी प्रदर्शनाच्या माध्यमातून एसटी ची स्वातंत्र वीरांना आगळी वेगळी आदरांजली…! चे उदघाटन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भगत यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रा. प. नाशिक/औरंगाबाद प्रदेशाचे उपमहा व्यवस्थापक नितीन मैंद,विभाग नियंत्रक अरुण सिया, कैलास पाटील विभागीय वाहतूक अधिकारी हे उपस्थित होते.