सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडांगळीसह १३ गावे पाणीपुरवठा समितीने लोकसहभागातून २३ एकर तलावातील सुमारे २५ कोटी लिटर दूषित व गढूळ पाणी बाहेर काढले आहे. त्यामुळे आता पूर्वभागातील गावांना स्वच्छ पाणीपुरवठा होऊ लागला आहे. पाणीपुरवठा योजनेच्या तलावातील गढूळ व दूषित पाणी बाहेर काढण्यासाठी वॉशआऊट अरेंजमेंटच्या कामास शासन स्तरावरुन वेळ लागणार असल्याने अशा प्रकारे प्रथमच लोकसहभागातून मोठे कार्य घडले आहे.
वडांगळी येथे असलेल्या या तलावातून पाणी झिरपू नये यासाठी जिओ मेंबरेन शीटचे आच्छादन टाकण्यात आले आहे. गेल्या सहा वर्षांपासून तलावातील पाण्याचा पूर्ण क्षमतेने उपसा न झाल्याने त्यातील दूषित पाण्यामुळे त्यात नव्याने सोडण्यात येणारे पाणीही दूषित होत असे.एवढ्या मोठ्या तलावातील पाणी काढण्यासाठी त्यास वॉशआउटची सोय करण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद पाणीपुरवठाविभागास केल्या होत्या.तथापि त्यासाठी सीडीओ मेरीची परवानगी आवश्यक असल्याने यात बराच वेळ जाणार असल्याची जाणीव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष नानासाहेब खुळे,उपाध्यक्ष भरत वाघ,सचिव पांडुरंग सोळंके, सदस्य सागर कोकाटे,योगेश पानगव्हाणे,योगेश गिते, महेंद्र कोकाटे,योगेश घुमरे,बाळासाहेब संधान,बाळासाहेब सापनर,रमेश खाडे, गोवर्धन शिंदे,मोहन चव्हाणके,सर्जेराव मुरडनर आदींना झाल्याने त्यांनी बिलाचा भार सोसत विद्युत पंपाच्या साहाय्याने तलावातील पाणी उपसा करण्याचा निर्णय घेतला.
तलावातील उपसा केलेले पाणी थेट नदीतून देवना बंधाऱ्यात जात असल्यामुळे या भागातील विहिरींची पाणीपातळी वाढेल,ह्या गोष्टीची जाणीव शेतकरी उत्तम खुळे, बापूसाहेब खुळे,यशवंत आढांगळे,भीमराव आढांगळे, शांताराम आढांगळे, सुहास आढांगळे, आनंदा आढांगळे,रघुनाथ खुळे,पोपट सैद,संदीप भोकनळ लहानू ठोक,निवृत्ती ठोक,सुरेश कोकाटे,उद्धव ठोक,रामभाऊ ठोक,सुनील ठोक,अशोक भगुरे,बाबुराव ठोक,भावका ठोक, विलास ठोक, कैलास ठोक,गोरख ठोक आदी शेतकऱ्यांना झाल्याने त्यांनी त्यासाठी पाईप,नालीखोदाई, आदीसाठी वर्गणी काढून खर्च केला असून काही प्रमाणात विजबिलाचा भारही सोसण्याचा निर्णय घेतला.दोन महिने मोटरपंपाद्वारे दिवस-रात्र पाणी उपसा सुरू ठेवण्यात आला होता.त्यासाठी कर्मचारी संपत आढांगळे यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांचे बंधू शेखर आढांगळे यांनीही त्यांना मदत केली.
शेतकऱ्यांच्या योगदानातून तलाव स्वच्छ झाला.आता तलावात स्वच्छ पाणी असून ते योजनेतील गावांना सोडण्यात येत आहे.यापुढील काळात योजनेवरील सर्व गावांना शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
– पांडुरंग सोळंके, सचिव, पाणीपुरवठा समिती
आमदार माणिकराव कोकाटे यांनी पूर्वभागातील गावांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या सूचना आम्हाला केल्या होत्या. त्यासाठी इच्छाशक्तीच्या जोरावर आम्ही तलावातील गढूळ व दूषित पाणी दोन महिन्यांत बाहेर काढू शकलो. आमदार कोकाटे यांच्या प्रयत्नांतून वीजेचा खर्च वाचविण्यासाठी सौर संयंत्रणा या ठिकाणी लवकरच बसविणार असून त्यांच्याच माध्यमातून उत्पन्नाचे मार्गही निर्माण करून ही योजना आगामी काळात आत्मनिर्भर बनवणार आहे.
– नानासाहेब खुळे, अध्यक्ष, पाणीपुरवठा समिती
शासकीय धोरणाच्या वेळखाऊपणामुळे जनता पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू नये, ही संवेदनशीलता अंगी असल्याने योजनेचे अध्यक्ष नानासाहेब खुळे यांनी काही प्रमाणातलोकसहभाग घेत तलावातील खराब पाणी बाहेर काढले.वडांगळीचे उपसरपंच असतांना त्यांनी ग्रामपंचायतीचा एक रुपयाही खर्च न करता तब्बल वर्षभर लोकसहभागातून घंटागाडी चालवून दाखवली व गावही स्वच्छ ठेवले.लोकसहभागाची ही उत्तम उदाहरणे आहेत.
– सुदेश खुळे, अध्यक्ष, ग्रीन व्हिजन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी