सिन्नर – येथील रतन इंडिया प्रकल्पातून वीजनिर्मितीसाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. या ठिकाणाहून लवकरच ५४० मेगावॉट इतकी वीजनिर्मिती होणार आहे. मंत्रालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात दोन वेळेस ऊर्जा मंत्री व संबंधित विभागाच्या सचिव व इंडिया बुल्सचे कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत सिन्नर तालुक्यातील गूळवंच येथील रतन इंडियाचा औष्णिक वीजप्रकल्प सुरू करण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मागणीवरून बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत आमदार कोकाटे यांनी १३५० मेगावॉटचा औष्णिक वीजप्रकल्प सुरू झाला तर या भागात रोजगाराच्या संधी वाढण्या बरोबरच २० किमी परिघातील शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा होऊ शकतो अशी माहिती देत हा वीजप्रकल्प सुरू करण्याची मागणी लावून धरली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाजनकोच्या अधिकाऱ्यांना या प्रकल्पातून वीजनिर्मिती करण्याच्या सुचना केल्या. या बैठकीनंतर आमदार माणिकराव कोकाटे यांनी रतन इंडियातून वीजनिर्मिती होण्यासाठी विविध अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन सातत्याने पाठपुरावा केला.
आमदार कोकाटे यांच्या आग्रहाखातर महाजनको व महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या ऊर्जा विभागाकडे यात लक्ष घालण्याची मागणी केली होती.त्यानुसार केंद्र सरकारचे एनटीपीसी पथक गेल्या ३ दिवसांपासून सिन्नर येथील रतन इंडिया प्रकल्प व परिसराची पाहणी करत आहे. रेल्वे मार्ग,रस्ते मार्ग याव्दारे होणारी कोळसा वाहतूक ही सोईस्कर होणार असल्याने या प्रकल्पाबाबत अनुकूलता दर्शवित त्यांनी केंद्र सरकारला तात्काळ अहवाल पाठवला आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनीही त्यासाठी सकारात्मकता दर्शविली आहे. प्रत्येकी २७० मेगावॉटचा एक असे ५४० मेगावॉटचे दोन युनिट सुरू होणार आहे.५४० मेगावॉट वीजनिर्मिती करण्यासाठी विकासक मिळाला आहे.त्यामुळे उर्वरित कामे होऊन महाराष्ट्र शासन व केंद्रसरकारच्या एनटीपीसी विभागाच्या माध्यमातून वीजनिर्मिती होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे झालेल्या बैठकीसाठी या रतन इंडिया प्रकल्पाचे मालक राजीव रतन हे दूरस्थ प्रणालीद्वारे हजर होते. त्यांनी हा प्रकल्प चालविण्याची आर्थिक क्षमता कंपनीची राहिली नसल्याने त्यांनी आमदार कोकाटे यांनी सुचविल्याप्रमाणे सरकारी भागीदारीत हा प्रकल्प सुरू करण्याची विनंती पवार यांच्याकडे केली होती. त्याचप्रमाणे रतन इंडियाचे अधिकारी राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांना या प्रकल्पातून वीजनिर्मिती होण्यामागील अडथळे सांगून त्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील,याचीही माहिती देऊन त्यांनी आमदार कोकाटे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला.त्यानुसार आमदार कोकाटे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बैठक घेऊन पाठपुरावा करत होते.शेवटी सर्वांच्या परिश्रमाची फलनिष्पत्ती झाली.
२५ हजार रोजगार उपलब्ध होतील..
हा प्रकल्प सुरू झाल्याने पुरेशी वीज उपलब्ध होईल.त्यातून नाशिक विभागातील पाच जिल्ह्यातील विशेष करून नाशिक जिल्ह्यातील कारखानदारी वाढीस लागेल.सिन्नर तालुक्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे २५ हजार रोजगार उपलब्ध होतील.त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.
रोजगाराच्या संधी वाढतील…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,ऊर्जा मंत्री नितीन राऊत,राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, ऊर्जा विभागाचे अधिकारी,रतन इंडियाचे अधिकारी व केंद्र सरकारच्या एनटीपीसी विभागातील अधिकाऱ्यांनी ह्या प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू होण्यासाठी प्रयत्न केले.५४० मेगावॉट वीजनिर्मितीतून या भागात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.
माणिकराव कोकाटे, आमदार