मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारताची गानसम्राज्ञी, सुप्रसिद्ध गायिका, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने केवळ भारत देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात शोककळा पसरली. ‘लता दीदी’ या क्रिकेटच्या मोठ्या चाहत्या होत्या. क्रिकेटबद्दल, त्या अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सामन्याबद्दल किंवा त्या संबंधित बातम्या पोस्ट करत असत. लतादीदींना क्रिकेट खेळाविषयी विशेष आकर्षण होते. विशेष म्हणजे लता मंगेशकर यांनी सन २०११ च्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याबाबत भारतीय क्रिकेट संघासाठी उपवासही केले होते, हे फार कमी जणांना माहीत असेल.
भारताने पाकिस्तानचा २९ धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केल्याने त्याची इच्छा पूर्ण झाली. त्या सामन्यात लतादीदींचा आवडता क्रिकेटर सचिन तेंडुलकरने ८५ धावांची शानदार खेळी खेळली होती. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने नऊ विकेट्सच्या मोबदल्यात २६० धावा केल्या आणि त्यानंतर एक चेंडू शिल्लक असताना पाकिस्तानचा संघ २३१ धावांत गुंडाळला गेला. त्यानंतर भारतीय संघाने सामना जिंकल्यानंतरच लता दीदीने आपला उपवास सोडला. त्या सामन्यानंतर लता मंगेशकर म्हणाल्या, ‘मी संपूर्ण सामना पाहिला आणि मी खूप तणावात होते. जेव्हा भारत खेळत असतो तेव्हा माझ्या कुटुंबातील प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रार्थना करतो. सामन्यादरम्यान मी, मीना आणि उषा यांनी काहीही खाल्ले नाही.
विशेष म्हणजे लता मंगेशकर या माजी भारतीय कर्णधार एम.एस. धोनीच्या मोठ्या चाहत्या होत्या. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताचा पराभव झाला तेव्हा धोनी लवकरच क्रिकेटला अलविदा म्हणेल अशा बातम्या येत होत्या. सदर बातमी ऐकून लतादीदी नाराज झाल्या आणि त्यांनी ट्विटरवर धोनीसाठी एक ट्विट केले. यामध्ये लता दीदी यांनी लिहिले, ‘प्रिय धोनी जी, आजकाल मी ऐकत आहे की, तुम्हाला खेळातून निवृत्ती घ्यायची आहे. कृपया याचा विचार करू नका. देशाला तुमची आणि तुमच्या योगदानाची गरज आहे. कृपया खेळातून निवृत्ती घेण्याचा विचारही करू नका. धोनीने तेव्हा निवृत्ती घेतली नाही, पण वर्षभरानंतरच त्याने निवृत्ती जाहीर केली.