नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा झाला आहे. जप्त केलेल्या हाडांशी श्रद्धाच्या वडिलांचा डीएनए नमुना जुळला आहे. डीएनए रिपोर्टमधून ही बाब स्पष्ट झाली आहे. परिणामी, पोलिसांना एक मोठा आणि सबळ पुरावा मिळाला आहे.
सीएफएसएलच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे की, मेहरौली आणि गुरुग्रामच्या जंगलात सापडलेली हाडे श्रद्धाची होती. आरोपी आफताब अमीन पूनावाला (२८) याच्या सांगण्यावरून दिल्ली पोलिसांनी मेहरौली आणि गुरुग्रामच्या जंगलातून ही हाडे जप्त केली आहेत. त्यानंतर नमुने सीएफएसएल लॅबमध्ये पाठवण्यात आले. मात्र, पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगलात सापडलेली हाडे श्रद्धाची असल्याचे समोर आले. टाईल्सवर आढळलेल्या रक्त आणि हाडांच्या नमुन्यांशी श्रद्धाच्या वडिलांच्या रक्ताच्या नमुन्याचा डीएनए जुळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्याच्या प्राथमिक तपासात श्रद्धाची हत्या झाल्याची पुष्टी झाली आहे. दिल्लीतील मेहरौली येथील या खळबळजनक हत्याकांडानंतर पोलिसांनी आरोपी आफताबला अटक करून त्याची चौकशी केली. यानंतर आरोपीच्या सांगण्यावरूनच जंगलातून हाडे जप्त करण्यात आली. पोलिसांना अद्याप श्रद्धाचे डोके आणि धड सापडलेले नाहीत.
आफताबच्या मागावर छतरपूर आणि मेहरौलीच्या जंगलातून १३ हून अधिक हाडे सापडली आहेत. छतरपूर जंगलातून जप्त केलेला जबडा आणि १०० फूट रस्त्यावरून सापडलेला मृतदेह पोलिसांनी तपासणीसाठी CFSL लॅबमध्ये पाठवला आहे. यासोबतच वडिलांचा नमुना डीएनए चाचणीसाठी घेऊन मॅचिंगसाठी पाठवण्यात आला आहे.
छिन्नविछिन्न मृतदेह बाहेर काढण्यासाठी वापरलेली साधने पोलिसांना अद्याप सापडलेली नाहीत. मात्र, पोलिसांनी किचनमधून पाच चाकू जप्त केले आहेत. याचा वापर आरोपींनी श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी केला होता. १८ मे रोजी आफताब आणि श्रद्धा यांच्यात भांडण झाले होते. आफताबने एका हाताने श्रद्धाचे तोंड दाबले. श्रद्धाने आरडाओरडा सुरू केल्यावर आरोपीने दुसऱ्या हाताने तिचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने मृतदेह बाथरूममध्ये ठेवला. त्याने मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे केले आणि नंतर ते फ्रीझमध्ये ठेवले. रात्री २ वाजता फ्रीझमधून मृतदेहाचा एकेक तुकडा बाहेर काढून तो मेहरौलीच्या जंगलात टाकायचा.
Shraddha Murder Case DNA Report Delhi Police Evidence
Crime Investigation