इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक मद्यधुंद व्यक्ती ट्रेनमध्ये एका ३० वर्षीय महिलेची छेड काढत होता. या महिलेसोबत तिचा नऊ वर्षांचा मुलगाही होता. छेडछाडीला महिलेने जोरदार विरोध केला. त्यामुळे आरोपी संतप्त झाला आणि त्यांनी महिलेला चालत्या ट्रेनमधून फेकून दिले. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. गुन्हा केल्यानंतर आरोपीने ट्रेनमधून उडीही मारली. हे हृदयस्पर्शी दृश्य पाहून महिलेचा मुलगा रडतच राहिला आणि पुढच्या डब्याकडे धावला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी जखमी असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील तोहाना शहराजवळ ही घटना घडली. फतेहाबाद पोलीस प्रमुख आस्था मोदी यांनी सांगितले की, ट्रेनच्या डब्यात फक्त तीन प्रवासी होते. मनदीप कौर असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी मंचला नरवाना येथून ट्रेनमध्ये चढला होता. तो दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे. महिला एकटी प्रवास करत असल्याचे पाहून आरोपीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ज्याचा महिलेने विरोध केला. नंतर आरोपीने महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने मुलाच्या आईला ट्रेनमधून ढकलले आणि स्वतः उडी मारली. हे सर्व घडले तेव्हा ९ वर्षांचा मुलगा ट्रेनमध्ये होता. तो खुप गयावया करीत होता पण काहीच झाले नाही.
रडत मुलाने वडिलांना घडलेला प्रकार सांगितला
मनदीप कौरचे पती हरजिंदर यांनी सांगितले की, त्यांची पत्नी गेल्या काही दिवसांपासून माहेरी राहत होती. १ सप्टेंबर रोजी रात्री ती ट्रेनने तोहाणा येथे परत येत होती. तोहानापासून सुमारे १५ ते २० किमी अंतरावर आल्यावर महिलेने तिच्या पतीला फोन केला आणि सांगितले की ती स्टेशनवर पोहोचणार आहे, तिला घेण्यासाठी तो पोहोचलो. हरजिंदर हा स्टेशनवर पत्नी आणि मुलाची वाट पाहत होता. ट्रेन थांबली पण, हरजिंदरला ट्रेनमधून रडत बाहेर येणारा मुलगा दिसला.
अखेर त्याने मुलाला विचारले की, आई कुठे आहे? उत्तरात मुलाने सांगितले की, ट्रेनमधील एका व्यक्तीने आईशी गैरवर्तन केले आणि रागाच्या भरात त्याने आईला ट्रेनमधून खाली फेकले. मुलाचे बोलणे ऐकून अवाक झालेल्या हरजिंदरने तातडीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलीस पथकाने घटनास्थळ गाठून आज सकाळी महिलेचा मृतदेह बाहेर काढला. आरोपीही काही अंतरावर जखमी अवस्थेत आढळून आला. आरोपी संदीपला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Shocking Women Thrown from railway Molestation
Crime Haryana Rape Sex Assault 9 Year Child