नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आईला बेशुध्द करत अवघ्या चार महिन्याच्या चिमुलकलीची गळा चिरून हत्या झाल्याच्या घटनेत पोलिस तपासामध्ये अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. सातपूरच्या ध्रुव नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी गंगापूररोड पोलिसांनी अतिशय कसून तपास केला. तसेच, कुटुंबियांची चांगलीच उलट तपासणी घेतली. त्यात खरे कारण पुढे आले आहे. चिमुरडीची हत्या तिच्या आईनेच केल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
असा केला होता बनाव
सोमवारी २० मार्च रोजीच्या रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली होती. ध्रुव नगर येथे भुषण यशवंत रोकडे व युक्ता भुषण रोकडे यांच्यासह त्यांचे कुटुंबिय राहतात. युक्ता रोकडे घरी एकट्या असतांना एक अज्ञात महिला घरात आली. त्यानंतर तिने विचारपुस करण्याचा बहाणा करत युक्ता यांच्या नाकाला रूमाल लावला. या रुमालावर कुठलेतरी औषध टाकण्यात आले होते. त्यामुळे युक्ता या बेशुध्द झाल्या. युक्ता बेशुध्द झाल्याची खात्री या महिलेने केली. त्यानंतर तिने घरात असलेल्या चार महिन्याची बालिका दुर्गुशी हिच्याकडे मोर्चा वळविला. या अज्ञात क्रूर महिलेने चिमुरड्या ध्रुवांशीची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर ही महिला तत्काळ फरार झाली. काही वेळाने युक्ता यांच्या सासूबाई घरात आल्या. त्या दूध घेण्यासाठी घराबाहेर गेल्या होत्या. घरात येताच त्यांनी पाहिले की, सून युक्ता या बेशुद्ध अवस्थेत आहेत. तर, चार महिन्यांची ध्रुवांशी ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे. त्यांनी जोरदार हंबरडा फोडला आणि आरडाओरडा केला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी रोकडे यांच्या घराकडे धाव घेतली. शेजाऱ्यांनी तातडीने भुषण रोकडे यांना व पोलिसांना फोन केला. हे सर्वजण घटनास्थळी दाखल झाले. हा सर्व प्रकार पाहून पोलिसही थक्क झाले. युक्ता यांनी सर्व प्रकार पोलिसांकडे कथन केला आहे, ही महिला पंजाबी ड्रेस घालून आली असल्याचे सांगितले. याप्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस तपासात कबुली
पोलिसांनी युक्ता रोकडे यांची कसून चौकशी केली. युक्ता यांच्यासह सर्व कुटुंबियांच्या कथनात पोलिसांना विसंगती आढळली. त्यानंतर पोलिसांना युक्ता यांच्यावर संशय आला. आणि पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती करताच युक्ता या हडबडल्या. अखेर युक्ता यांनी हत्येची कबुली दिली आहे.
अशी केली ध्रुवांशीची हत्या
युक्ता या गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. ध्रुवांशी ही वडिलांसारखे दिसते, असे कुटुंबिय बोलायचे. शिवाय नातेवाईकही असेच सारखे म्हणायचे. त्याशिवाय ध्रुवांशी ही माझ्या ऐवजी पती आणि सासूकडेच अधिक खेळायची. त्यामुळेच मी ध्रुवांशीची हत्या केली. सासूबाई घराबाहेर गेल्या होत्या. घरातील सुरीने मी ध्रुवांशीची हत्या केली. त्यानंतर सुरी धुवून किचनमध्ये ठेवून दिली, असे युक्ता यांनी पोलिसांना सांगितले
म्हणून डिप्रेशनमध्ये
रोकडे कुटुंब हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील आहे. भूषण रोकडे यांच्याशी युक्ता यांचा विवाह झाला. मात्र, भूषण यांचा हा दुसरा विवाह होता. सासू, सासरे, दीर हे सातत्याने म्हणायचे की, ध्रुवांशी ही वडील भूषण यांच्यासारखी दिसते, त्यांच्यासारखेच वागते, अनुकरण करते. ध्रुवांशी ही आई युक्ताचे थोडेही अनुकरण करत नाही. हे टोमणे युक्ता यांना चांगलेच लागले. युक्ता यांना त्याचा प्रचंड त्रास व्हायचा. यातूनच ध्रुवांशीविषयी युक्ता यांच्या मनात राग निर्माण झाला. अखेर ध्रुवांशीची हत्या करण्याचे युक्ता यांनी ठरवले होते.
Shocking Nashik Crime 4 Months Old Girl Murder Police Investigation