मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या महिनाभरापासून शिवसेना पक्षाचे जणू काही ग्रहच फिरले आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत पक्षात उभी फूट पाडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद बळकावले आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेतून अनेक मंत्री आमदार आणि खासदार बाहेर पडले आहेत. आता विदर्भातील एक प्रमुख नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ हे देखील यांनी देखील शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिल्याने हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातो.
आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनाम्याचे पत्र पाठवून दिले आहे. अडचणीच्या काळात पक्ष आणि नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना आनंदराव अडसूळ यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. सिटी कोऑपरेटिव्ह बँक बँकेतल्या कथिक घोटाळ्याप्रकरणी अडसूळ यांची पूर्वी चौकशी करण्यात आली होती. ज्यावेळी ईडीने कारवाई केली त्यानेळी पक्षाने साधी विचारपूस देखील केली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
आनंदराव अडसूळ हे शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघातून ते निवडून येत असत. परंतु अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी अडसूळ यांचा पराभव केला होता. शिवसेनेत नेतेपद ही अतिशय महत्त्वाचे मानले जाते. सध्या शिवसेनेत नऊ व्यक्ती हे नेतेपदावर आहेत. विदर्भात आनंदराव अडसूळ यांचे को-ऑप क्षेत्रातील मोठे नाव आहे. तसेच राज्यातील सर्व सहकारी बँकेत कर्मचाऱ्यांची युनियन असून अडसूळ हे गेल्या अनेक वर्षांपासून या युनियनचे नेतृत्व करतात.
आनंदराव अडसूळ यांची ही स्वतःची सहकारी बँक होती. सिटी को-ऑपरेटीव्ह बँक या बँकेचे अडसूळ अध्यक्ष होते. तर त्यांचे नातेवाईक हे संचालक मंडळावर होते. या बँकेचा टर्नओव्हर सुमारे १ हजार कोटींच्या आसपास होता. मात्र ही बँक आता गेल्या दोन वर्षांपासून बुडीत निघाली आहे. कर्ज वाटपात अनियमितता आणि एन पी ए मध्ये झालेल्या घसरणीमुळे बँक डबघाईला आली आणि अखेर बुडीत निघाली. कर्ज वाटपात अनियमितता आणि एन पी ए मध्ये झालेल्या घसरणीमुळे बँक डबघाईला आली आणि अखेर बुडीत निघाली. तसेच
दरम्यानच्या काळात अडसूळ हे आजारी पडले होते त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया ही करण्यात आली, मात्र आजरपण, अडचणीच्या काळात देखील पक्ष नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे आनंदराव अडसूळ यांचा मुलगा अभिजीत अडसूळ हा एकनाथ शिंदे गटासोबत अगोदरपासूनच आहे. आता अडसूळ यांनी देखील राजीनामा दिला आहे. मात्र आनंदराव अडसूळ शिंदे गटात जाणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेत आमदारांची आणि नेतेमंडळींची गळतीच लागल्याचे दिसत आहे. यापुर्वी विधानसभेत बहुमत चाचणीवेळी विदर्भातील नेते आमदार संजय बांगर यांनीही आपला पाठिंबा शिंदेगटाला जाहीर करुन सर्वांनाच धक्का दिला.
दुसरीकडे खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र राष्ट्रपतीपदासाठी भाजप युतीच्या उमेदवार द्रौपती मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली होती. त्यातच गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे १८ खासदार व २२ माजी आमदार बंडखोर गटात सामील होणार असल्याचा दावा केला होता. आता शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी आपल्या शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देत मोठा धक्का दिला आहे.
आणखी महत्वाची बाब म्हणजे शिवसेनेने खासदार भावना गवळी यांना लोकसभा सभागृहातील शिवसेनेच्या प्रतोद पदावरुन हटवल्यानंतर त्यांच्याजागी राजन विचारे यांची नियुक्ती केली आहे. ही कारवाई चर्चेत असताना आता, अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या बंडानंतर खासदारांच्या मनातील नाराजी बाहेर येऊ लागल्याचे दिसत आहे.
Shivsena Vidarbha Leader Resign from his Party Post Shivsena Crisis Aanandrao Adsul Uddhav Thackeray