मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आणि खासदारांना फोडल्यानंतर शिंदे यांनी आता नव्या शिवसेना भवनाची जय्यत तयारी केली आहे. विशेष म्हणजे, दादरमध्येच हे शिवसेना भवन साकारले जाणार आहे.
गेल्या पाच दशकांपासून शिवसैनिकांचे न्याय भवन म्हणून स्थापन झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना भवनावर शिंदे दावा करतील, असे पूर्वी मानले जात होते, मात्र आता एकनाथ शिंदे यांनी दादरमध्ये आणखी एक शिवसेना भवन सुरू करण्याचा निश्चय केल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात त्यांची जय्यत तयारी सुरू असून लवकरच ते याबाबत पावले उचलणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पक्षाचे दादरमध्ये मोठे कार्यालय हवे आहे.मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांना भेटणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच, त्यांच्या गटातील आमदार आणि समर्थक हे कार्यकर्त्यांसह त्यांना मुंबईला भेटायला येत आहेत. मुंबईत येण्यासोबतच ते आपल्या समस्याही मुख्यमंत्र्यांशी शेअर करत आहेत. अशा हजारो नागरिकांना भेटण्यासाठी मुंबईच्या मध्यवर्ती भागात मोठ्या कार्यालयाची गरज असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. त्यादृष्टीने लवकरच पावले उचलली जातील, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे.
शिवसेना शाखा, शिवसेना भवन, शिवसेना पक्ष हे सर्व शिवसेनेचे आहे. या प्रस्तावित नवीन कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न सुटणार असल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे. तसेच, या कार्यालयाला काय नाव द्यायचे याचा निर्णय एकनाथ शिंदे हे स्वतः घेणार असल्याचे सरवणकर यांनी सांगितले आहे. दादर हा मुंबईचा मध्यवर्ती भाग आहे. याच ठिकाणी बाळासाहेबांची समाधी आहे. दादरचा शिवाजी पार्कशी संबंध असून शिवसेनेच्या सहा दशकांच्या आठवणीही आहेत. त्यामुळे या ठिकाणी कार्यालय उभारल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवे संकेत मिळणार असल्याचे शिंदे यांचे मत आहे.
Shivsena Politics Eknath Shinde Uddhav Thackeray
Political Crisis