वाघाशी कधी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची – खा. संजय राऊत

नाशिक – वाघाशी कधी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची असे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रतित्त्युर दिले. पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिल्यास आम्ही वाघाशी मैत्री करायला तयार आहे असे सांगितले होते. त्यावर खासदार राऊत यांनी त्यांना उत्तर देत वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. चंद्रकातदादा गोड माणूस आहे.त्यांनी गोड खावं, गोड बोलावं, त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत असेही ते म्हणाले.
खा. राऊत पाच दिवसाच्या उत्तर महाराष्ट्र दौ-यावर असून त्यांनी आज नाशिक येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, कार्यकर्त्यांना मुंबईत बोलावण्याऐवजी मी स्वतः उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी हा दौरा आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. विधानसभेवर १०० पार आकडा जावा त्यासाठी आतापासून प्रयत्न सुरु असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी ते म्हणाले की, भाजप राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे आणि देशाचे मोठे नेते आहेत. जे यश भाजपला प्राप्त झाले ते त्यांच्या चेह-यामुळेच आहे. पंतप्रधान हे देशाचे असतात असेही ते म्हणाले, यावेळी त्यांनी मालाडची दुर्घटना दुर्दैवी असल्याचे सांगत, मुंबईतील पावसाच्या परिस्थितीवरून टीका करणाऱ्यांना टीका करू द्या, मुख्यमंत्री, महापौर, सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून काम करत होते असेही त्यांनी सांगितले.