मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे ही भेट राजकीय होती की अन्य यासंदर्भात चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी आहे. याचनिमित्त राऊत हे सपत्नीक शिवतीर्थावर आले होते. यावेळी त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले. समाधीस्थळी पुष्प अर्पण केले. त्यानंतर तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या राज ठाकरे यांच्या घराकडे राऊत यांनी मोर्चा वळविला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. राज यांनी कृष्णकुंज शेजारीच शिवतीर्थ हे नवे घर साकारले आहे. याच नवीन घरात राऊत यांनी राज यांची भेट घेतली. राज यांनी त्यांना नवे घर दाखविले. तर, राऊत यांनी आपल्या कन्येच्या विवाहाचे निमंत्रण राज यांना दिले. समारंभाला नक्की या असा आग्रह त्यांनी केला. त्यास राज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. राऊत आणि ठाकरे दाम्पत्याने मनमोकळ्या गप्पा मारल्या. ही भेट राजकीय स्वरुपाची नव्हती. त्यामुळे राजकीय कुठलीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.