नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात गुरुवारी रात्री मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यात महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, माजी स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे, माजी नगरसेवक सुदाम ढेमसे, माजी नगरसेवक श्यामकुमार साबळे, माजी प्रभाग सभापती चंद्रकांत खाडे, माजी नगरसेवक सुवर्णा मटाले, माजी नगरसेवक पुनम मोगरे, माजी नगरसेवक जयश्री खर्जुळ, माजी नगरसेवक ज्योती खोले, माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया, राजू लवटे यांचा समावेश आहे. या प्रवेश सोहळ्यावेळी पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, महानगरप्रमुख प्रवीण (बंटी) तिदमे यांच्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटाचे माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. याचा मुहूर्तही अगोदर टळला होता. पण, आज हे माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. शिंदे गटाला महानगरात हवी ती ताकद मिळत नव्हती. पण, या १२ माजी नगरसेवकांच्या प्रवेशाने आता नाशिकमध्ये शिंदे गटाची ताकद वाढणार आहे.