पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘काय झाडी…काय डोंगार…काय हाटील… एकदम ओकेमध्ये हाय..’ हा डायलॉग आठवतोय का? आठवतो म्हणजे काय.. आठवतोच. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा अजरामर डायलॉग आहे शिंदे गटाचे आमदार शहाबापू पाटील यांचा. या फेमस डायलॉगमुळे राजकारणातील वजन आणि फेम वाढल्यानंतर आता बापूंनी प्रत्यक्ष वजन कमी केलं आहे आणि लवकरच ते एका नव्या लूकमध्येही दिसणार आहेत.
नागपूरच्या अधिवेशात फक्त दोन दिवस हजेरी लावणारे बापू नेमके गेले कुठे? सुषमा अंधारेंनी जोरदार टिका केल्यानंतरही शहाजीबापू काहीच कसे बोलले नाही? असे अनेक प्रश्न सर्वांना पडले होते. त्याची उत्तरं आता मिळू लागली आहेत. शहाजीबापूंनी सध्या वजन कमी करण्याकडे लक्ष दिलं आहे. श्री श्री रविशंकर यांच्या बंगळुरू येथील आश्रमात ते सध्या पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करण्यात व्यस्त आहेत. आता गंमत म्हणजे या आश्रमाच्या आजूबाजूलाही छान हिरवी झाडी आहे, डोंगर आहे आणि अगदी हॉटेलसारखी व्यवस्थाही आहे. त्यामुळे शहाजीबापूंचे सध्या एकदम ओक्केमध्ये आहे असे म्हटले तरी चालेल.
२४ डिसेंबरपासून शहाजीबापू या आश्रमात होते. १ जानेवारीला त्यांचा आश्रमातील मुक्काम संपला आहे. अवघ्या ८ दिवसात त्यांनी तब्बल ९ किलो वजन कमी करून बापू परत आले आहेत. विरोधकांच्या टिका आणि स्वतःवरचे मीम्स ऐकून कंटाळलेल्या बापूंनी आश्रमात दररोज बौद्धीक ऐकून स्वतःचे प्रबोधन करून घेतले. आश्रमातील हॅपीनेस कार्यक्रमात योगासने, ध्यान, व्यायाम अशी त्यांची दिनचर्या होती.
पालेभाज्या, कडधान्ये, शुद्ध शाकाहारी जेवण यावर शहाजीबापूंना राहावे लागले. नॉनव्हेजवर ताव मारणारे शहाजीबापू पूर्णवेळ शुद्ध शाकाहारावर कसे दिवस काढत असतील, याची कल्पना न केलेलीच बरी. पण त्याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. बापूंचे वजन कमी झाल्यामुळे त्यांचा लूकही बदलला आहे. आता या नव्या लूकमध्ये ते धारधार शब्दांनी विरोधकांना घायाळ करतील, असा सर्वांना विश्वास आहे. आता बापूंना या आश्रमात जाण्याचा सल्ला कुणी दिला असेल, याचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे.
दरम्यान, लवकरच मिम्समध्ये ‘काय बॉडी… काय लूक.. एकदम ओक्केमध्ये हाय’… असा डायलॉग वाचायला मिळाला तर आश्चर्य वाटणार नाही.
वजन आटोक्यात रहावे व जनसेवेसाठी आणखी जोमाने पळता यावे यासाठी बंगरुळु येथील श्री श्री रविशंकर महाराजांच्या आश्रमामध्ये पंचकर्म आणि सुदर्शन क्रियेद्वारे वजन कमी केलं असून आता एकदम फिट आणि फाईन झाल्यासारखं वाटतंय.#weightloss #stayfit#shahajibapu #sangola#newyearresolution pic.twitter.com/tM7HfoDyjo
— Shahajibapu Patil – शहाजीबापू पाटील (@ShahajibapuP) January 2, 2023
Shinde Group MLA Shahaji Bapu Patil Weight Loss
Health Diet Obesity Art Of Living Body Transformation