इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या हिंदू धर्मात ज्योतिष, पंचांग, राशी यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. दररोज सकाळी उठून आपले सर्वप्रथम आपले भविष्य पाहणारे कोट्यवधी नागरिक आहेत. ज्योतिष आणि भविष्यावर श्रद्धा असणारी माणसे योग, ग्रह, साडेसाती यांची माहिती वारंवार घेत असतात. साडेसाती हा एक अडचणीचा आणि समस्याकारक काळ समजला जातो. यासाठी शनी दोषी आहे, असे समजले जाते. परंतु केवळ शनी ग्रहाला दोष देऊन उपयोग नाही तर साडेसाती किंवा वाईटच असते असे नाही तर वाईटातून चांगले घडते असे म्हटले जाते. नेमके खरे काय साडेसाती विषयीची काही माहिती जाणून घेऊ या…
एकूण नवग्रहांपैकी रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू आणि केतू यापैकी शनी या ग्रहाविषयी अकारण मनात भय बाळगले जाते. शनी हा ग्रह न्यायदान करणार, कर्मकारक ग्रह आहे. शनिच्या कृपाकटाक्षाने अनेकांचा किंबहुना प्रत्येकाचा भाग्योदय होत असतो. त्याचे प्रधान कारण शनी व गुरु या ग्रहांच्या सहकार्याशिवाय कोणतेही कर्म करणे शक्य होत नाही. कार्य मंगलकारक असो व अमंगलकारक त्यात शनिची भूमिका अनन्यसाधारण आहे, असेच म्हणावे लागेल.
आपली साडेसाती सुरू होणार असल्याचे समजते, तेव्हा जणू काही आपणावर संकट ओढावणार आहे, असा आपला समज होतो. प्रत्यक्षात साडेसाती येणे ही एक प्रक्रिया आहे. साडेसाती केव्हा येते, ते पहाणे गरजेचे आहे. समजा आपली जन्म रास तूळ आहे. तर कन्या-तूळ -वृश्चिक राशीतून होणारे शनिचे भ्रमण आपणास साडेसाती आणणारे ठरणार आहे, म्हणजे राशीस बारावा-पहिला-दुसरा शनी असताना साडेसाती असते.
खरे म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार शनीची साडेसाती एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर साडे सात वर्षे राहते. शनि सध्या मकर, धनु आणि कुंभ राशीत आहे. कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीच्या आधारे शनीची साडेसाती शुभ की अशुभ हे ठरवता येते. ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही जातकाच्या कुंडलीत बलवान शनि व्यक्तीला लाभ देतो. दुसरीकडे, कमकुवत शनि एखाद्यासाठी विविध समस्या निर्माण करतो. अशा वेळी त्याचे वाईट परिणाम टाळण्यासाठी नियमितपणे शनीचे काही उपाय केले जाऊ शकतात.
केवळ जन्म राशीस शनी प्रतिकूल आहे, यामुळे प्रगतीचा मार्ग आकुंचन पावेल किंवा मार्गात अचानक गतीरोधक निर्माण होतील, असे मुळीच नाही. ज्याप्रमाणे आपल्या जन्मराशीस महत्त्व आहे, त्याचप्रमाणे जन्म नक्षत्र, जन्मचंद्राचे अंश, शनिचे भिनाष्टक वर्ग, कुंडलीचे सर्वाष्टक वर्ग, गोचर शनिचे सर्वांच्या चक्रातून होणारे कक्षात्मक भ्रमण, शनी भ्रमण करत असलेल्या राशीस्वामीचे जन्म कुंडलीतील स्पष्ट अंश, गोचर शनीचे नवमांश भ्रमण, कुंडलीतील महादशास्वामी, अंतर्दशास्वामी, गोचर गुरु- राहु-केतु याची साथ आहे का, या सर्वांची तौलनिक चिकित्सा केल्याशिवाय केवळ साडेसाती आहे, याचा एकमात्र अर्थ शनीमुळे समस्या, अडचणी येतातहेत, असा घेणे चुकीचे ठरले.
साडेसाती हा अनन्यसाधारण महत्त्व असणारा योग आहे. साडेसातीचा विचार हा जन्मकुंडलीतील चंद्र व गोचरी शनि यांच्याशी निगडित आहे. चंद्रापासून ४५ अंश मागे शनिचे अंशात्मक भ्रमण सुरू होते, तेव्हा साडेसाती सुरू होते व चंद्रापासून ४५ अंशापुढे शनी गेला की साडेसाती संपते. सर्वसाधारण जन्मकुंडलीतील चंद्राच्या बाराव्या राशीत शनिने प्रवेश केला की, साडेसाती सुरू होते. ही पहिली अडीच वर्षे असतात. चंद्रराशीवरून शनिचे भ्रमण सुरू झाले की, दुसरी अडीच वर्षे व चंद्राच्या दुसऱ्या राशीत शनिने प्रवेश केला की, तिसरी अडीच वर्षे सुरू होतात. असा हा सर्व मिळून साडेसात वर्षांचा काळ म्हणून यास साडेसाती असे म्हणतात.
महत्त्वाचे म्हणजे साडेसाती हा शनी-चंद्राशी निगडीत ग्रहयोग आहे. चंद्र हा मन व भाग्यकारक आहे. तर शनी हा ग्रहमंडळातील न्यायाधीश असून, न्यायसत्तेचे प्रतिक आहे. शनी कर्मकारक आहे. त्यामुळे शनी हा जीवनास कार्यरत करणारा महत्त्वाचा ग्रह आहे. आपल्या पूर्वकर्मानुसार त्यास शुभाशुभ फळ देण्याचा सर्वाधिकार शनिग्रहास आहेत. त्यामुळे साडेसाती ही मानवाच्या आयुष्यातील शुद्धीकरण प्रक्रिया आहे, असे मानले जाते.
साडेसाती सुरू असताना काय उपाय करावेत, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. त्यावर, आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे व जप करताना आकाश मुद्रा करणे लाभप्रद ठरते. स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य देणे लाभप्रद ठरते. हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत. हनुमंताची उपासना केल्याने मनोबल प्राप्त होते, असे काही उपाय सांगितले जातात. तसेच प्रत्येक शनिवारी विधीनुसार शनिदेवाची पूजा केल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होते.
गरजूंना मदत करा, शनिशी संबंधित गोष्टी शक्यतो दान करा. शनीला बळ देण्यासाठी उजव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी घाला. दर शनिवारी शनीला तांबे आणि तिळाचे तेल अर्पण करा.शनिवारी शनि स्तोत्राचे पठण करा. अपंग लोकांची शक्य तितकी सेवा करा. पण लक्षात ठेवा सूर्यास्तानंतर शनिदेवाची पूजा करणे अधिक फलदायी मानले जाते. त्यामुळे शनिदेवाची पूजा आणि शनी ग्रहाचे उपाय हे सूर्यास्तानंतरच करावेत, असा सल्लाही ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांनी दिला आहे .
Shani Sadesati Detail Information
Horoscope Astrology Worship