वॉशिंग्टन – शाळा हे विद्या मंदिर समजले जाते. या ठिकाणी ज्ञानदानाचे कार्य होते. परंतु काही वेळा भ्रष्टाचारी माणसे या ज्ञानदानाच्या क्षेत्रातही वाईट कृत्य करतात. अशीच एक घटना अमेरिकेत घडली.
कॅलिफोर्नियाच्या शाळेतील सेवानिवृत्त प्राचार्य मेरी मार्गरेट क्रुपर (वय ६९) यांनी पदावर असताना संस्थेच्या निधीतून सुमारे ६ कोटी १० लाख रुपयांचा अपहार केला आणि सर्व पैसे जुगाराच्या व्यसनात व्यतीत केले. या प्रकरणात अमेरिकेच्या न्याय विभागाने त्यांच्यावर सरकारी निधीचा अपहार आणि काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप केला. या खटल्यात त्यांनी हा पैसा शाळेच्या निधीतून काढून घेतल्याचा आरोप मान्य केला आहे.
सध्या नन म्हणून काम करणाऱ्या या महिलेला ४० वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कॅलिफोर्निया सेंट्रल डिस्ट्रिक्ट अटॉर्नीच्या कार्यालयाने सांगितले की, सेंट जेम्स कॅथोलिक स्कूलचे प्राचार्य म्हणून काम करताना क्रुपरने १० वर्षांत पैसे चोरले. त्यानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये ती सेवानिवृत झाली होती.
ती लोकांना गरीब नन असल्याचे सांगत राहिली, पण तिने जुगार आणि इतर संबंधित खेळात खर्चासाठी शाळेच्या निधीतील ६ कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च केले. आर्थिक कागदपत्रांमधील गैरव्यवहाराची बाब उघडकीस आल्यानंतर त्यांनी सर्व आर्थिक नोंदी जाळण्याचे आदेश कर्मचार्यांना दिले होते. परंतु अखेर तिची ही चोरी आणि अपहार उघडकीस आला.