नाशिक – सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेतर्फे दरवर्षी स्व.माधवराव लिमये याच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा कार्यक्षम संसद सदस्य पुरस्कार सन २०२०-२१ चा प्रथमच ना. नितीन गडकरी यांना देण्यात येणार आहे. हा समारंभ दि.१० फेब्रुवारी,२०२२ रोजी दुपारी १२.३० वा. स्थळ – २, मोतीलाल नेहरू मार्ग, नवी दिल्ली येथे ना. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी होत आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे ना. डॉ. भारतीताई पवार, खा. डॉ.सुभाष भामरे, खा.हेमंत गोडसे, खा. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. हा कार्यक्रम ऑनलाईन सार्वजनिक वाचनालयाच्या फेसबुक पेज वरून प्रसारित करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक वाचानलायाच्या कार्यकारी मंडळाने केले आहे. यापूर्वी हा पुरस्कार महाराष्ट्रातील कार्यक्षम आमदार यांना दिला जात होता. यावर्षीपासून या पुरस्काराची व्याप्ती वाढविण्यात आली असून वर्षा आड हे पुरस्कार विधीमंडळ सदस्य आणि संसद सदस्य यांना दिले जाणार आहेत.
स्व.माधवराव लिमये हे नाशिकचे जुन्या पिढीतील ज्येष्ठ समाजवादी नेते होते त्यांनी विधान परिषद सदस्य म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. स्व. लिमये हे पत्रकार, लेखक व सामाजिक, शेक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शक आणि तळमळीचे कार्यकर्ते होते. त्यांचा सार्वजनिक वाचानाल्याशी घनिष्ठ संबंध होता. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची कन्या डॉ.शोभाताई नेर्लीकर व जावई डॉ.विनायक नेर्लीकर यांनी दिलेल्या देणगीतून सदरचा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सार्वजनिक वाचनालय, नाशिक दरवर्षी विधान परिषद, विधान सभा, लोक सभा, राज्य सभा ह्या पैकी एका सदस्याची निवड ही कार्यक्षम आमदार/खासदार पुरस्कारासाठी निवड करीत असते.
खासदार हेमंत गोडसे, आमदार हेमंत टकले, पत्रकार सौ.सुरेखा टाकसाळे, पत्रकार जयप्रकाश पवार, अतुल कुलकर्णी, डॉ.विनायक नेर्लीकर, डॉ.सौ.शोभाताई नेर्लीकर व सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.विलास औरंगाबादकर, प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, डॉ.धर्माजी बोडके या निवड समितीवर पुरस्कार निवडीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. रु. ५० हजार रोख, स्मृतिचिन्ह व शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे १८ वे वर्ष आहे. मागील १७ वर्ष अनुक्रमे सर्वश्री आ. बी.टी. देशमुख, गणपतराव देशमुख, आर.आर.पाटील, प्रमोद नवलकर, शोभाताई फडणवीस, जीवा पांडू गावित, दत्ताजी नलावडे, गिरीश बापट, सा.रे.पाटील, पांडुरंग फुंडकर, जयवंतराव पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, बच्चू कडू, निलमताई गोऱ्हे, गिरीश महाजन, धनंजय मुंडे ह्या मान्यवर आमदारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
ना.नितीन गडकरी याचा परिचय –
नितीन जयराम गडकरी यांचा जन्म २७ मे , १९५७ रोजी झाला. बालपणापासून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे ते स्वंयसेवक असून त्यांनी संघ विचारधारेच्या विविध राजकीय संघटनामधून आपल्या राजकीय कारकीर्देला सुरुवात केली. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षात सक्रीय राहिले. नागपूर विभाग पदविधर मतदार संघातून ते विधान परिषदेवर निवडून गेले. महाराष्ट्र विधान परिषदेत त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून प्रभावी कामगिरी केली. शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात (१९९५ ते १९९९) ते महाराष्ट्र राज्य शासनात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून सहभागी झाले होते त्यांच्याकडे नागपूर जिल्हाचे पालकमंत्री पदही होते. त्यांच्या काळात महाराष्ट्र राज्यात रस्तेविकासाच्या अनेक नवनवीन योजना राबविल्या गेल्या आणि महाराष्ट्रातील दळणवळण गतिमान झाली. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाचा विस्तार केला आणि महाराष्ट्रातील सामान्य माणसाला पक्षाशी जोडून घेतले.
त्यांच्या राजकीय कार्यकौशल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद त्यांच्याकडे चालत आले. त्यांच्या काळात पक्षाची वाटचाल केंद्रात सरकार पर्यंत झाली. २०१४ साली देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यावर केंद्रीय मंत्रीमंडळात ते सहभागी झाले. भूपृष्ठ वाहतूक जहाज बांधणी, जलसंसाधन नदीविकास आणि गंगासंरक्षण मंत्री म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळातील आणि लोकसभेतील प्रभावी व कार्यक्षम मंत्री म्हणून देशात त्यांची ओळख निर्माण झाली आहे. नितीन गडकरी हे एक यशस्वी उद्योजक आणि शेतकरी आहेत. त्यांनी एक साखर कारखाना, १ लाख २० हजार लिटर क्षमतेचे इथेनॉल ब्लेंडिग संयत्र, २६ मेगावॅट क्षमतेचे वीज निर्मिती केंद्र उभारले आहे. सकारात्मक उर्जेचे व्यक्तिमत्व आणि सर्वांना सोबत घेउन कार्य करण्याच्या त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे ते नेहमी वरिष्ठांच्या मर्जीतले ठरले. पेट्रोल डिझेल चा मर्यादित साठा, रस्त्यावरील वाहनांची गर्दी लक्षात घेता नितीन गडकरी नेहमी नवनीन संसाधनांचा उपयोग करण्यावर भर देतात. यातुनच समुद्रातुन प्रवास करण्यावर भर देत त्यांनी मुंबईमधे अनेक प्रकल्पांची सुरूवात केली आहे.
मुंबई गोवा हा प्रवास नुकताच समुद्रातुन सुरू झाला असुन हे त्यांच्या प्रयत्नांचे यशच म्हणावे लागेल. विजेवर चालणाऱ्या बसेस देखील त्यांच्या प्रयत्नांनी अनेक मोठयां शहरांमधे सुरू झाल्याचे आज पहावयास मिळते. हे नितीन गडकरींच्या कामाचे यशच म्हणावे लागेल की त्यांनी सरकारला ग्रामीण भागाच्या कनेक्टिविटी करीता ७०० करोड रूपयांची मागणी केली. त्यामुळे महाराष्ट्रातील एकुण लोकसंख्येच्या ९८ टक्के भाग रस्त्यांशी जोडला गेला. लोकांच्या समस्या यामुळे मोठया प्रमाणात कमी झाल्या. अशी गावे रस्त्यांशी जोडली गेली जी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर रस्त्यांकरीता अद्यापही प्रतिक्षेतच होती. केंद्र सरकारने गडकरींना राष्ट्रीय ग्रामिण रस्ते विकास योजनेचे अध्यक्ष बनविले. नितीन गडकरींनी ६० हजार करोड रूपयांची एक महत्वाकांक्षी योजना सरकारला सादर केली. या योजनेला आज प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या लोकप्रिय नावाने ओळखले जाते. स्वतःला राजकारणी म्हणवुन घेण्यापेक्षा व्यापारी उद्योगपती म्हणवुन घेणे त्यांना जास्त भावते. कृषी क्षेत्राशी देखील त्यांचा निकटचा संबंध आहे. त्यांच्या पूर्ति ग्रुप ऑफ कंपनीज् चा अनेक उद्योगांमधे समावेश आहे.