मुंबई – भारतीय बाजारपेठेत दररोज अनेक स्मार्टफोन लॉन्च केले जात आहेत, कारण आधुनिक काळात मोबाईल ही उपयुक्तच नव्हे तर अत्यावश्यक वस्तू बनली आहे. त्यामुळे आजच्या काळात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो. अनेक जण विविध प्रकारची कामे मोबाईलवर करतात. त्यातच सॅमसंगचा नवा 5G स्मार्टफोन येत असून यात उत्कृष्ट वैशिष्ट्ये, डिझाइन आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी A53 – 5G
भारतात सॅमसंग गॅलेक्सी A53 – 5G फोनचे उत्पादन सुरू झाल्याचे बोलले जात आहे. अद्याप त्याला दुजोरा मिळालेला नाही. मात्र नवीन सॅमसंग फोन हा या वर्षी मार्चमध्ये लॉन्च झालेल्या गॅलेक्सी A52 ची सुधारित एडीशन असेल. गॅलेक्सी A53 5G फोन होल-पंच डिस्प्ले डिझाइन आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो.
लवकरच बाजारात
सॅमसंगचा गॅलेक्सी A53 5G चे उत्पादन कंपनीच्या ग्रेटर नोएडा कारखान्यात सुरू झाले आहे. या फोनमध्ये वाटरप्रुफ (पाणी-प्रतिरोधक) तंत्र असून ते गॅलेक्सी A52 सारखे आहे. सॅमसंगचा गॅलेक्सी A53 5G च्या लॉन्चबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र सदर फोन भारतात पुढच्या वर्षी लवकर लॉन्च होऊ शकतो.
अफलातून वैशिष्ट्ये
सॅमसंगचा गॅलेक्सी A53 5G मध्ये 120Hz अल्मोलेड डिस्प्ले आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 64-मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर आहे. सॅमसंग गॅलेक्सी A53 5G चे काही स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. त्यानुसार, होल-पंच डिस्प्ले असेल. 8.14mm-जाड बिल्डसह तो येईल. काळ्या आणि पांढर्या रंगात तो उपलब्ध होऊ शकतो.