नाशिक -सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजनेतून शिक्षण घेतलेल्या पुष्कराज साळुंके व प्रितेश महाजन या विद्यार्थ्यांनी उत्तुंग झेप घेतली आहे. त्यांनी जयेश टोपे या सहकाऱ्यांस सोबत घेऊन बनविलेल्या ‘रिव्हॅम्प मोटो’ या नाशिकस्थित ‘स्टार्टअप’ ने नेत्रदीपक यश मिळवत देशातील पहिल्या ‘ २० मॉड्यूलर हेवी-ड्यूटी इलेक्ट्रीकल व्हेइकल स्टार्टअप’ मध्ये आपले स्थान पटकावले आहे.
अमेरिकास्थित बहुराष्ट्रीय कंपनी अल्टैर इंडिया, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, भारतीय उद्योग महासंघ आणि आय.आय.टी,मद्रास यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील ‘अल्टैर स्टार्टअप चैलेंज’ या स्पर्धेत या तिन्ही विद्यार्थ्यांच्या ‘स्टार्टअप’ ने पहिल्या २० मध्ये स्थान पटकावले आहे. पुष्कराज साळुंखे याने एनडीएमव्हीपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व प्रितेश महाजन याने सपकाळ नॉलेज हब येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. विशेष म्हणजे दोन्ही विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण सामाजिक न्याय विभागाच्या ‘भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती’ मधून पूर्ण केले आहे.
‘अल्टैर स्टार्टअप चैलेंज’ स्पर्धेत देशभरातून १५० हून अधिक ‘स्टार्टअप’ने सहभाग नोंदविला होता. पुष्कराज, प्रितेश व जयेश या तीघांनी मिळविलेल्या यशाबद्दल सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या ‘स्टार्टअप’ साठी सरकारी पातळीवर लागणाऱ्या मदतीसाठी सहयोग करणार असल्याचे ही सांगितले आहे.
काय आहे ‘रिव्हॅम्प मोटो स्टार्टअप’ –
भारतात दूचाकी वाहनांचा वापर फक्त प्रवास करण्यासाठी केला जात नाही. दूचाकीच्या माध्यमातून हातावर पोट असलेले व्यक्ती व्यवसाय म्हणून ही वापर करतात. दूध घरोघरी पोहचविणे, पोहे-उपमा-इडलीचे स्टॉल, चहा विक्री अशा प्रकारचे असंख्य व्यवसाय दूचाकीच्या माध्यमातून केले जातात. हे व्यवसाय करण्यासाठी आपल्या वाहनांमध्ये जुगाड करून म्हणजे वेल्डींग, मॉडीफिकेशन वगैरे करून ‘दूचाकी ’ला व्यवसायासाठी तयार करतात. यामुळे गाडीची व्यवस्थित बांधणी न झाल्यामुळे अशा वाहनांची अपघात होण्याची शक्यता जास्त असते. तसेच मुळात ‘दूचाकी’ ही या व्यवसायांसाठी नसते; पण पोट भरण्यासाठी दूचाकीचा व्यवसाय म्हणून वापर करणे, हातावर पोट असलेल्या लोकांना आवश्यक आहे. तेव्हा ही अडचण लक्षात घेऊन या ‘स्टार्टअप’ मध्ये लोकांना व्यवसाय करण्यास सुलभ होईल. असे सात प्रकारचे ‘मॉड्यूलर’ या तिघांनी बनविलेले आहेत. या ‘मॉड्यूलर’चा वापर करून आपण सहजपणे कुठेही व्यवसाय करू शकतो. विशेष म्हणजे या मॉड्यूल सोबत ‘स्मार्ट व्हेइकल ऐज ॲसेट (SVA)’ ही संकल्पना वापरत त्यांनी या ‘स्टार्टअप’ मधील ‘मॉड्यूलर’ साठी सहाय्य ठरेल अशा ‘इलेक्ट्रीकल व्हेईकल’ची निर्मिती ही केली आहे. यामुळे प्रदुषणाला अटकाव व इंधन बचत ही सहज शक्य होणार आहे. या आगळ्या-वेगळ्या ‘स्टार्टअप’ ला सरकारी पातळीवर उत्तेजन मिळल्यास हे ‘स्टार्टअप’ फिरते विक्रते, व्यावसायिकांसाठी वरदान ठरणार आहे.