मुंबई – बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सलमा आगा यांच्यासोबत लुटीची घटना घडली आहे. दोन दुचाकीस्वारांनी त्यांची पर्स हिसकावून पोबारा केला होता. त्या पर्समध्ये त्यांच्या घराच्या चावीसह अनेक महत्त्वाच्या वस्तू होत्या. दरम्यान, या प्रकरणी सलमा आगा यांनी वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. परंतु पोलिसांनी गुन्हाच दाखल केला नाही, असा आरोप त्यांनी केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, अभिनेत्री सलमा आगा शनिवारी आपल्या बंगल्यातून एका ऑटोरिक्षामध्ये बसून औषधाच्या दुकानात चालल्या होत्या. त्यादरम्यान दोन संशयित दुचाकीस्वारांनी त्यांची पर्स लंपास करून पलायन केले.
या प्रकरणी सलमा आगा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, माझ्या पर्समध्ये दोन मोबाईल फोन, काही रोख रक्कम, चाव्या आणि इतर वस्तू होत्या. मी चोरीची तक्रार करायला वर्सोवा पोलिस ठाण्यात गेले असता गुन्हा नोंदवण्यासाठी कमीत कमी तीन तास लागतील असे पोलिस अधिकार्याने सांगितले.
सलमा आगा म्हणाल्या, माझी तक्रार नोंदविली गेली नाही. त्यामुळे मी आज ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. या जागेवर झालेली ही पहिली लुटीची घटना नाहीये. यापूर्वीही येथे लूटमार, पैसे हिसकावण्याच्या घटना घडल्या आहेत. दोन्ही आरोपी हायएंड मोटरसायकलवर होते. पोलिसांनी जवळच नाकाबंदीही केली होती.
दरम्यान, वर्सोवा पोलिसांनी स्पष्टीकरण दिले की, आम्ही त्याच दिवशी गुन्हा नोंदविला असता, परंतु संबंधित अभिनेत्रीकडे वेळ नव्हता. त्या नंतर येतील असे म्हणाल्या. या प्रकरणाबद्दल आम्ही दोन वेळा त्यांच्याशी संपर्क केला परंतु त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. त्या पोलिस ठाण्यात येतील तेव्हा गुन्हा नोंदवला जाईल, असे पोलिस अधिकार्यांनी सांगितले.
सलमा आगा यांनी निकाह या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यांनी अनेक पाकिस्तानी आणि भारतीय चित्रपटात काम केले आहे. अभिनयाशिवाय त्यांनी गायनही केले आहे. त्यांचे “दिल के अरमां आंसुओ में बह गए” हे गाणे आजही लोकप्रिय आहे. गायनामध्ये सलमा आगा यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला आहे.