मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात महापालिकेकडे भ्रष्टाचाराची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीमुळेच लटके यांचा राजीनामा महापालिकेकडून स्विकारला जात नसल्याचे सांगितले गेले. लटके यांनी ३ ऑक्टोबरला राजीनामा दिला पण प्रत्यक्षात भ्रष्टाचाराची तक्रार १२ ऑक्टोबरला करण्यात आली. हा तक्रारदार कोण असा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जात आहे. यासंदर्भात आता माहिती समोर आली आहे.
राज्यात सुमारे तीन महिन्यांपूर्वी झालेले सत्तांतर, शिवसेनेमध्ये पडलेली उभी फुट आणि दोन्ही गटांकडून झालेले आरोप प्रत्यारोप कोर्टकचेऱ्या या पार्श्वभूमीवर सध्या मुंबई मधील अंधेरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चांगलीच गाजत आहे. कारण शिवसेना पक्ष फुटीनंतर प्रथमच ही निवडणूक होणार असल्याने दोन्ही गटाकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजुरीचे प्रकरण गाजत असताना आता त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आल्याने या प्रकरणाला आणखीनच वेगळे वळण लागले आहेत.
संपूर्ण राज्याचे लक्ष अंधेरीतील पोटनिवडणुकीकडे लागले आहे. अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने तिथे निवडणूक होणार आहे. त्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवडणूक जवळ आली असतानाच त्यात नवीन तिढा निर्माण झाला आहे. दरम्यान अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शुकवार दि. १४ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस आहे. लटके यांचा राजीनामा स्विकारण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे लटके यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बीएमसीमध्ये लिपिक म्हणून नोकरीवर असणाऱ्या ऋतुजा लटके यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. मात्र हा राजीनामा बीएमसीकडून मान्य करण्यात आला नव्हता. याविरोधात अखेर हायकोर्टात ठाकरे गटाला दाद मागावी लागली होती. त्यावेळी पालिकेतर्फे युक्तिवाद करण्यासाठी उभे राहिलेले वकील अनिल साखरे यांनी एक भयानक आरोप केला. लटके यांच्या विरोधात लाच घेणे आणि भ्रष्टाचाराची एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे पालिकेने लटके यांचा राजीनामा तातडीने मंजूर करण्यास नकार दिला होता. त्यामुळे हा ठाकरे गट आणि ऋतुजा लटके यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
गुरुवारी मुंबई हायकोर्टानं लटके यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यामुळे मोठा दिलासा ठाकरे गटासह ऋतुजा लटके यांना मिळाला. आता लटके यांच्याविरोधात भाजपचे मुरजी पटेल अशी लढत अंधेरी पोटनिवडणुकीत होणार आहे. अंधेरी पूर्वमध्ये सुमारे २ लाख ८० हजारांच्या आसपास मतदार आहेत. पण हा संमिश्र लोकसंख्या असलेला मतदारसंघ आहे. त्यामुळे त्याला मुंबईतील मिनी भारत समजला जाते.
फुटलेली शिवसेना आणि सध्या चहुबाजूंनी होणारी कोंडी याचीही सहानुभूती उध्दव सेनेला जाईल, अशी शक्यता आहे. मात्र त्यांच्या विरोधात असलेले मुरजी पटेल हे गुजराती असले तरीही त्यांचाही जनसंपर्क उल्लेखनीय आहे. आता त्यांनाच उमेदवारी देत भाजप-शिंदे गट लटकेंविरोधात सर्व शक्ती पणाला लावत आहेत. तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरण्याआधी ऋतुजा लटके यांच्याकडून शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. मात्र लटके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान ऋतुजा लटके यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार आहे, असा दावा महापालिकेच्या वतीने न्यायालयात करण्यात आला.
लटके यांच्याविरोधात नेमकी तक्रार कोणी दाखल केली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता वेगळीच माहिती समोर आली आहे. ऋतुजा लटके यांच्याविरोधात रमलू चिन्नय्या नावाने तक्रार दाखल झाली होती. तसेच या तक्रार अर्जावर अंधेरीमधील एका चाळीचा पत्ता देण्यात आला होता. याबाबत स्थानिकांशी चर्चा केली असता रामलू चिन्नय्या या व्यक्तीला तिथे कोणही ओळखत नसल्याचे सांगण्यात आहे. तसेच लटके यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणे बाकी आहे,त्यामुळे विरोधकांना हा मुद्दा निवडणुकीसाठी मिळण्याची शक्यता आहे तसेच या संदर्भात उलट सुलट चर्चा सुरू आहे.
Rutuja Latke Corruption Complaint BMC
Shivsena Politics Mumbai Election Andheri