मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या परिवहन विभागाने वाहनांशी संबंधित सेवा ऑनलाइन केल्या आहेत. मात्र तरीही कागदपत्रे सादर करण्यासाठी आरटीओच्या कार्यालयात खेटे घालाव्या लागत होत्या. परिवहन विभागाने नागरिकांची यातूनही सुटका केली आहे. आवश्यक कागदपत्रे ऑनलाइनपद्धतीने सादर करण्याची सेवा उपलब्ध केली आहे. या सुविधेमुळे आरटीओ कार्यालयात जाण्याचा बराचसा वेळ वाचणार आहे.
महाराष्ट्रात सध्या ५० आरटीओ आणि डेप्युटी आरटीओ आहेत. विविध सेवा ऑनलाइन केल्यानंतरही संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी पुन्हा आरटीओत जावे लागत होते. मात्र केंद्र सरकारने १६ सप्टेंबर २०२२ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ५८ सेवा आधारकार्ड क्रमांकाचा वापर करून नागरिकांना फेसलेस पद्धतीने देण्याचे सूचित केले. महाराष्ट्रात परिवहन विभागामार्फत अनुज्ञप्ती (लायसन्स), नोंदणी प्रमाणपत्र, कर तसेच परवानासंबंधित ११५ सेवा देण्यात येत असून यातील ८४ सेवा या ऑनलाइन केल्या आहेत. ८४ सेवांपैकी एकूण १८ सेवा यापूर्वीच ‘फेसलेस’ पद्धतीने करण्यात आल्या आहेत.
आधार क्रमांकाशी लिंक
परिवहन कर भरणासह अनेक सेवा आधारकार्ड क्रमांकाशी जोडण्यात आल्या आहेत. प्रथम शिकाऊ लायसन्स परीक्षा ऑनलाइन करण्यात आली. या सेवेबरोबरच वाहनांचे राष्ट्रीय परवाना सुविधा, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदल, वाहनचालक अनुज्ञप्तीचे दुय्यमीकरण, वाहन हस्तांतरण, अनुज्ञाप्तीवरील पत्ता बदल, अनुज्ञप्तीचे नूतनीकरण, वाहनांकरिता विशेष परवाना, वाहनांसाठी तात्पुरता परवाना, दुय्यम योग्यता प्रमाणपत्र, दुय्यम शिकाऊ अनुज्ञप्ती, शिकाऊ अनुज्ञप्तीवरील पत्ता बदल, वाहकांच्या अनुज्ञप्तीवरील पत्ता बदल आणि धोकादायक मालवाहू वाहने चालविण्याची परवानगी या सेवा फेसलेस केल्या आहे.
आणखी सात सेवांचा लाभ
वाहनांकरिता विशेष परवाना, वाहनांसाठी तात्पुरता परवाना, दुय्यम योग्यता प्रमाणपत्र, दुय्यम शिकाऊ अनुज्ञप्ती, शिकाऊ अनुज्ञप्तीवरील पत्ता बदल, वाहकांच्या अनुज्ञप्तीवरील पत्ता बदल आणि धोकादायक मालवाहू वाहने चालविण्याची परवानगी या सात सेवाही नुकत्याच फेसलेस करण्यात आल्या आहेत. अर्जदाराला कुठूनही अर्ज करता येणार आहे. त्यामुळे अर्जदाराच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच कागदपत्रांची प्रत काढण्याची गरज नाही. पुढच्या टप्प्यात आणखी काही सेवा फेसलेस करण्यात येणार आहेत. लायसन्ससंबंधित वाहन मालकाच्या नावात बदल करणे, लायसन्सवरील जन्मतारखेतील चूक सुधारणे, परवाना जमा करणे आदींचा त्यात समावेश आहे.
RTO office 84 Services Online Transport Vehicle