नाशिक – सामाजिक क्षेत्रात काम करणारी कार्यकर्ती, एक कलाकार,कवयित्री आणी अभिनेत्री अशी ओळख असलेल्या कल्की या तृतीय पंथीयला रोटरी क्लब ऑफ गोदावरीचे अध्यक्ष राजेश सिंघल यांनी रोटरी क्लबचे सदस्यत्व देऊन तिचा सन्मान केला. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
कल्की सुब्रमनियम ही तृतीय पंथीय समुदायासाठी काम करते. कल्कीची सहोदरी नावाची संस्था असून ती तृतीय पंथीय लोकांच्या आर्थिक,सामाजिक शैक्षणिक उन्नतीसाठी काम करत आहे. या संस्थेद्वारे या विशेष लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी, समान दर्जाची वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. सन २०१४ सालच्या सर्वोच्च न्यायालयात समान दर्जा संबंधी लढाईत कल्कीचा सिंहाचा वाटा होता. कल्कीचे स्वतःचे तामिळ भाषेत कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. नर्तकी या मुख्य प्रवाहातील सिनेमा मध्ये काम करणारी कल्की पहिली तृतीयपंथी महिला आहे. या सिनेमातून तिने समानतेचा संदेश दिला. तिच्या अनेक कामांसाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
सन २०१५ सालच्या महिला दिनी फेसबुकने निवडलेल्या १२ प्रभावशाली महिला ज्यांनी फेसबुकला त्यांचे काम जगासमोर आणण्यासाठी स्थान दिले ,अशा महिलांमध्ये कल्कीची निवड झाली होती. एक कलाकार म्हणून तिला ‘वुमन ऑफ वर्थ’चे स्थान मिळाले. कल्की ही उत्कृष्ट चित्रकार असून तिचे चित्र भारताबरोबर,कॅनडा,अमेरिका येथे देखील प्रदर्शित झाले आहेत. चित्रकलेच्या साधनेतून ती तृतीयपंथीय समुदायातील व्यक्तींना प्रोत्साहित करते. तिच्या या कामाची दखल घेत रोटरी क्लब ऑफ गोदावरीचे अध्यक्ष सिंघल यांनी कल्किला रोटरीचे सदस्यत्व देऊन तिचा व तिच्या कार्याचा सन्मान केला.
तृतीयपंथीयांसाठी काम करण्याची आणखी संधी
कल्की करत असलेल्या कामाचा गौरव करता यावा व तिला तृतीयपंथीयांसाठी काम करण्याची आणखी संधी मिळावी यासाठी तिला रोटरीचे सभासद करण्याचे ठरवले. इतर सहकार्यांनीही त्याचे स्वागत करत पाठिंबा दिला. लवकरच रोटरीच्या माध्यमातून तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करून त्यामाध्यमातून तृतीय पंथीयांना प्रशिक्षण देण्यात येईल. त्यातून त्यांचा चागल्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
– राजेश सिंघल, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ गोदावरी
