इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यातील माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने सासरच्या मानसिक व शारिरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणावर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी या घटनेची दखल घेत राज्य महिला आयोगाने बावधन पोलिसांना तत्काळ चौकशी करुन कारवाई करण्याचे निर्देश दिले अशी प्रतिक्रिया दिली. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी टीका केली आहे.
रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे की, आपल्या महिला आयोगाचा कारभार हा असा आहे ‘वराती मागनं घोडं’ बरं बाईंचा आविर्भाव पण असा की जणू काही कोणत्या तरी चांगल्या कामासाठी देशाला संबोधित करत आहेत !
कालपरवा छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असताना बाई सर्वात आधी स्वागतासाठी उभ्या होत्या. समोर मीडिया होती पण त्यावेळी बाईंनी वैष्णवीच्या केसवर बोलणे टाळले त्यामुळे या प्रतिक्रियेवर आम्हाला वाटते की दाल में कुछ काला है ! ही जबरदस्तीने द्यायला सांगितलेले प्रतिक्रिया आहे का ? हा प्रश्न आमच्या मनात आहे.
वैष्णवीची केस ही पुण्याची आहे, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत. हगवणे हा अजित दादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. पण अजित दादांनी अद्यापही या प्रकरणात शब्द उच्चारला नाही. अजित दादांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनीही या हगवणेची हकालपट्टी केल्याबाबतची नोटीस काढायला हवी होती. पण अजूनही त्याची हकालपट्टी केली गेली नाही. एरवी सर्व गोष्टींमध्ये बोलणाऱ्या
चित्रा वाघ ही या प्रकरणात गप्प आहेत.
या अर्थ असा की सत्तेतील सर्वच लोक ‘आपला’ म्हणून हगवणेला वाचवत आहे. त्यामुळे अजूनही आरोपी सापडत नाही, त्यांची हकालपट्टी होत नाही आणि पाठराखण केली जात आहे.