मुंबई – आजच्या महागाईच्या काळात अनेक जण खर्चात कपात करीत बचत करून थोडेफार पैसे जमा करतात आणि बँकेत ठेवतात. परंतु बँकेत पैसे ठेवताना, त्यावर चांगले व्याज मिळेल, अशी बहुतांश बँक खातेदार किंवा ग्राहकांची अपेक्षा असते. त्याकरिता अनेक जण शासकीय बँके ऐवजी खासगी बँका किंवा पतपेढ्यामध्ये पैसे गुंतवतात. कारण या ठिकाणी अधिक परतावा मिळतो, अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र काही वेळा अधिक परताव्याच्या अपेक्षेने फसवणूक देखील होऊ शकते. कारण अशा पतसंस्था बंद पडू शकतात, याकरता काळजी घेणे आवश्यक आहे.
एखादी बँक जास्त व्याजदर देत असेल, तर ठेवीदारांनी स्वतःचे पैसे गुंतवण्यापूर्वी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. काही उच्च व्याजदराच्या ऑफर व्यवहार्य आहेत, परंतु तेथेही ठेवीदारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. असे मत रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केले. ‘डिपॉझिटर फर्स्ट: गॅरंटीड टाइम-बाउंड डिपॉझिट इन्शुरन्स पेमेंट ऑफ 5 लाख’ कार्यक्रमाला संबोधित करताना, दास बोलत होते.
शक्तिकांत दास पुढे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी अधिक परतावा मिळविण्याच्या इच्छेने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. बँकिंग व्यवस्था मजबूत आणि प्रवाही ठेवण्यासाठी रिझव्र्ह बँक कटिबद्ध आहे, मात्र हे काम सर्वांना एकत्रितपणे करावे लागेल. बँकिंग प्रणालीतील प्रत्येक भागधारकाची ही एक सामान्य जबाबदारी आहे, मग ती बँक व्यवस्थापन असो, ऑडिट समिती असो, किंवा कोणतेही नियामक प्राधिकरण असो, ठेवींचा विमा भरणे हा या दिशेने शेवटचा उपाय असावा.
आरबीआय नियामक मार्गदर्शक तत्त्वे मजबूत करण्याच्या धोरणाचा अवलंब करत आहे. तसेच बँका पुढे जाऊन अधिक लवचिक पद्धतीने कार्य करत राहतील. कोराना साथीच्या काळात देशातील नागरिकांनी सहकार्य दाखवले आहे आणि भारताने जागतिक अर्थव्यवस्थेचे वाढीचे मार्गदर्शक बनण्याची वेळ आली आहे. बँकिंग व्यवस्थेशी संबंधित सर्व पक्षांनी एकत्रितपणे काम केल्यानेच हे शक्य होईल, असे दास म्हणाले.