इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उद्योगपती मुकेश अंबानी यांची डिजिटल सेवा देणारी रिलायन्स जिओ कंपनी सिलिकॉन व्हॅलीमधील टेक स्टार्टअप टू प्लॅटफॉर्म्स या कंपनीत गुंतवणूक करणार आहे. रियालन्स जिओने टू प्लॅटफॉर्म्समध्ये २५ टक्क्यांची भागिदारी घेण्यासाठी १.५ कोटी डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. सॅमसंग टेक्नॉलॉजी अँड अॅडव्हांस्ड रिसर्चचे माजी अध्यक्ष प्रणव मिस्त्री यांनी टू प्लॅटफॉर्म्सची स्थापना केली आहे.
टू प्लॅटफॉर्म्स हा स्टार्टअप आर्टिफिशिअल इंटिलिजन्स रियालिटीच्या क्षेत्रात काम करत आहे. यामध्ये आर्टिफिशिअल इंटिलिजन्स टेक्नॉलॉजीच्या धारावरील उत्पादन तयार करण्यात येते. जिओ प्लॅटफॉर्म्सचे संचालक आकाश अंबानी यांनी यासंदर्भात घोषणा केली. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, आम्ही आर्टिफिशिअल इंटिलिजन्स, मशीन लर्निंग, मेटावर्स आणि वेब ३.० या क्षेत्रात काम करणाऱ्या टू प्लॅटफॉर्म्सच्या संस्थापक टीमची क्षमता आणि अनुभवामुळे विशेष प्रभावित झालो आहोत. या क्षेत्रात त्यांच्यासोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.
यानिमित्ताने टू प्लॅटफॉर्म्सचे संस्थापक मिस्त्री म्हणाले, की भारताच्या डिजिटल परिवर्तनामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या जिओसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे आम्ही रोमांचित झालो आहोत. आम्ही एकत्रितरित्या आर्टिफिशिअल इंटिलिजन्सच्या सीमा वाढवण्याचा तसेच आर्टिफिशिअल वास्तविकतेचा प्रयोग नागरिकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. या संपादन करारांतर्गत टू प्लॅटफॉर्म्स आणि रिलायन्स जिओ एक नवे तंत्रज्ञान स्वीकारून आर्टिफिशिअल इंटिलिजन्स, मेटावर्स आणि विविध तंत्रज्ञानाचे निर्मिती करणार आहेत.