मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने अहमदनगर येथील नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर अनेक निर्बंध लावले आहेत. याअंतर्गत ग्राहक आपल्या खात्यातून महिन्याला दहा हजार रुपये काढू शकणार आहेत. बँकेची आर्थिक परिस्थिती बिघडल्याच्या पार्श्वभूमीवर बँकेने हे निर्बंध लावले आहेत.
बँकिंग नियमन अधिनियम (सहकारी समित्यांना लागू) १९४९ अंतर्गत हे निर्बंध ६ डिसेंबर २०२१ पासून पुढील सहा महिने कायम राहणार असून, निर्बंधांचा आढावा घेतला जाईल. रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय नगर बँक कोणालाही कर्ज किंवा आगाऊ रक्कम देऊ शकणार नाही. तसेच कर्जाचे नूतनीकरण करता येणार नाही. बँकेला कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही, तसेच मालमत्तांचे हस्त्तांतरण करता येणार नाही.
बँकेच्या ग्राहकांना आपल्या बचत किंवा चालू खात्यातून दहा हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही. ग्राहकांना आदेशाची माहिती मिळण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या आदेशाची प्रत बँक परिसरात लावण्यात आली आहे. बँकेवर निर्बंध लावणे याचा अर्थ बँकेचा परवाना रद्द केला असा होत नाही, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
आर्थिक परिस्थिती विस्कटल्याने रिझर्व्ह बँकेने यापूर्वी मलकापूर सहकारी बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेसह अनेक निर्बंध लावले होते. रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय मलकापूर शहरी सकहारी बँक कर्जाचे नूतनीकरण, कोणतीही गुंतवणूक आणि परतफेड करू शकणार नाही. या सहकारी बँकेवर लावलेले निर्बंध बुधवार सायंकाळीपासून ते पुढील सहा महिन्यांपर्यंत लागू राहणार आहेत. बँकेची आर्थिक परिस्थिती रुळावर येईपर्यंत काही निर्बंध लागू राहतील, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.