– जयेश पाटील (अध्यक्ष, वन्यजीव संरक्षण संस्था, नाशिक)
पावसाळा सुरू झाला की शेतीच्या कामांची लगबग सुरू होते शेती शिवारात , मानवी वस्तीमध्ये साप आढळण्याचे प्रमाण वाढते. आणि यातूनच सापांना मारण्याच्या घटना व सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. पावसाळा सुरु होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो.
त्याचबरोबर साप राहत असलेल्या अडगळीच्या जागी, बिळामध्ये पाणी साचते त्यामुळे भक्ष मिळवणे आसरा शोधण्या साठी सुरक्षित जागेच्या शोधात साप भ्रमण करत असतात . या कालावधीत मानवी वस्तीच्या आसपास देखील सर्प आढळून येतात. म्हणुन या काळात नागरिकांनी साप दिसला तर घाबरुन न जाता आपण साप आणि त्यांचे वर्तन याची किमान शास्त्रीय माहिती घ्यायला हवी.
आपल्या परिसरात मानवी वस्तीजवळ आढळणाऱ्या केवळ चारच सर्प प्रजाती या विषारी आहेत. त्या म्हणजे नाग, मण्यार, घोणस व फुरसे यातील शेती शिवारात नाग आणि घोणस यांचे वास्तव्य जास्त असते नागरी रहिवासी भागात नाग , घोणस, या सह मण्यार या विषारी सापाचा वावर नेहमी आढळून येतो मण्यार साप निशाचर असल्याने या सापाचा दंश सहसा रात्रीच्या वेळी होतो, म्हणून जून ते ऑक्टोबर दरम्यान प्रत्येक नागरिकाने जमिनीवर झोपणे टाळले पाहिजे तसेच रात्रीच्या वेळी होणारा कोणताही दंश अपरिचित सर्पदंश समजून तात्काळ सिव्हिल किंवा जवळच्या हॉस्पिटलमध्ये जावे.
सर्प आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्थेने शून्य सर्पदंश हे अभियान सुरू केले आहे . यामध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहचून जनजागृती, सापांबद्दल माहिती तसेच दंश होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी याबद्दल माहिती दिली जाते तसेच वनविभागाचा ही यात सहभाग असतो. त्याच बरोबर वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे राबवत असलेल्या शून्य सर्पदंश अभियानात जनजागृती करतांना ज्या उपाययोजना सांगतो त्यातील महत्वाची माहिती आपल्या वाचकांना उपलब्ध करून देत आहोत.
नागरिकांनी ती माहिती आत्मसात करावी असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सदर अभियानासाठी प्रभाकर निकुंभ , सुशांत रणशूर , प्रमोद महानुभव , अमोल सोनवणे , जयेश पाटील ,दीपक महाजन ,धीरज शेकोकरे , हेमंत कोलते , पवन नागपुरे , मंगेश आहेर , भावेश जाधव , रामेश्वर साळवे , निखिल साबळे ,अजित कर्पे , आकाश तडवी , आदी कार्यरत आहेत.
घराच्या आसपास साप येऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी
1) घराच्या व कुम्पणाच्या भिंती यांना पडलेल्या तडा बुजवा. ड्रेनेज पाईप ला जाळ्या बसवा यांमध्ये पाली, उंदरासारखे प्राणी बसतात व त्यांची शिकार करण्यासाठी साप येण्याची शक्यता असते.
2) घराजवळ पाला- पाचोळा, कचऱ्याचे ढिग, दगड- विटाचे ढिग, लाकडांचा साठा करुन ठेऊ नये.
3) घराच्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा घराला लागुन मोकळी जागा असल्यास त्यावर उगवणारे तण कंपाउंड च्या भिंती पासून एक ते दोन मीटर पर्यंत काढावे पूर्ण तण काढू नये पूर्ण वनस्पती नष्ट केल्यास त्यावर वाढणाऱ्या अनेक कीटक, आणि फुलपाखरू प्रजाती नष्ट होतात .
4) खिडक्या- दरवाजे यांना लागून झाडांच्या फांद्या येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
5) सरपण, गोवऱ्या घरालगत न ठेवता, काही अंतरावर पण जमिनीपासून थोड्या उंचीवर ठेवाव्यात.
6) गवतातुन चालताना पायात बूट असावेत. शेतात काम करताना गवतात एकदम हात घालू नका जवळ छोटी काठी ठेवा जिथे काम करायचे आहे तिथे मातीचे लहान ढेकळे फेकून , काठीने ठोकून मग काम सुरू करा
7) अंधारातुन जाताना नेहमी टॉर्च सोबत बाळगावी.
8) कोणताही साप सरपटत असतांना भिंतीच्या लगत चालतो जमीनीवर झोपायाचे असल्यास अंथरुण भिंती लगत न करता मध्यभागी करावे.
10) जर आपण आणि साप समोरासमोर आलो तर घबरुन न जाता शांत उभे राहावे,
घरात, अंगणात साप आल्यास काय कराल?
1) साप घरात , अंगणात आल्यास घाबरु नका, शांत राहा, त्याला न मारता वनविभाग किंवा आपल्या माहितीतील जाणकार सर्पमित्राला बोलवा.
2) सर्पमित्र येईपर्यंत सुरक्षीत अंतरावरुन सापावर व्यवस्थित लक्ष ठेवा, लहान मुले, पाळीव प्राणी यांना सापा पासून दूर ठेवा. जेणे करुन त्यांना अपाय होणार नाही.
3) सापाच्या जवळ जाण्याचा, फोटो काढण्याचा , त्याला पकडण्यासाठी त्यावर टोपली, बादली झाकण्याचा किंवा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करु नका. अश्यावेळेस साप चिडून तुमच्यावर हल्ला करु शकतो.
4) नाग, मण्यार, घोणस, फुरसे हे मानवी वस्तीजवळ आढळणारे प्रमुख चार विषारी साप आहेत. यांचा दंश प्राणघातक असतो अश्या सापापासून सावध राहावे.
5) सापांबद्दल पूर्ण ओळख आणि माहिती नसतांना कोणताही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका
सर्पदंश झाल्यास काय कराल?
– सर्पदंश झाल्यावर करावयाचे प्रथम कार्य म्हणजे लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचणे.
– भारतात बिनविषारी सापांची संख्या जास्त आहे, मात्र सर्प दंश झाल्यानंतर अनेकवेळा रूग्ण दगावतात याला कारण सापांबद्दल असलेली भीती आणि अंधश्रद्धा हे आहे.
– त्याच बरोबर प्रथमोपचार न केल्याने रूग्ण दगावतात असं म्हटलं जातं, अनेक ठिकाणी रुग्णालयात वेळेवर न पोहोचणे, ग्रामीण भागात सर्प दंशावर प्रभावी उपचार पद्धती नसल्याने, तसेच प्रतिसर्पविष लस उपलब्ध नसल्यानेही रूग्ण दगावतो.
– सर्प दंश झाल्यावर सर्वात महत्वाचं आहे ते रूग्णाने धीर धरणे, अनेक वेळा भीतीनेच रूग्ण दगावतात.
– सर्पदंश झाल्याचे लक्षात आल्यावर रुग्णाला धीर दिला पाहिजे शक्य तितक्या लवकर वैद्यकीय उपचार मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
– सर्पदंश झाल्यावर पीडित व्यक्तीला ताबडतोब रुग्णालयात नेले पाहिजे हे लक्षात घ्या.
– शक्य असल्यास सापाकडे नीट लक्ष द्या. लांबून फोटो घेता आल्यास सापाचा फोटो घ्या जेणे करून आपल्याला डॉक्टरांना किंवा
– सर्पमित्रांना सापाबद्दल माहिती देता येईल.
– पीडित व्यक्तीला हालचाल करू देऊ नका.
– जखमेच्या अवयवांवर दागिने असल्यास ते काढून घ्या.
– पायाला किंवा पंजाला साप चावला असल्यास पायातील बूट काढून घ्या.
– जखम पाण्याने आणि साबणाने धुवा.
– पूर्ण ज्ञान असल्या शिवाय चिरा देऊ नका
– सर्पदंश झाल्यावर तात्काळ रुग्णालयात दाखल होऊन उपचार सुरू झाल्यास रुग्ण 100℅ वाचतो . या प्रकारे काही उपाययोजना केल्या आणि खबरदारी घेतली तर सर्पदंशाचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी करता येऊ शकते.
– सर्पदंश म्हणजे मृत्यू हा समज मनातून काढला, सापांची शास्त्रीय माहिती मिळवली तर नक्कीच सर्प आणि मानव संघर्ष टाळता येईल
– जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी घरात सर्प निघाला असेल किंवा सर्पदंश झाल्यास तर संस्थेच्या (८१४९३३०८७३) या
हेल्पलाइन क्रमांकांवर अथवा वनविभागाच्या १९२६ या क्रमांकावर संपर्क करावा.
Rainy Season Sneck Dos Donts Precaution