पुणे( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे जिल्ह्यात सध्या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मुठा नदीलादेखील त्यामुळे पूर आला असून एक थरारक घटना या ठिकाणी घडली. जोशी पुलाजवळ ५ प्रवासी असलेली कार पुरात वाहून गेली. रात्री १ वाजून ४६ मिनिटांनी हा प्रकार घडला.
नदीला पूर आला की नदीपात्राजवळ लावलेल्या गाड्या वाहून जाण्याचे प्रकार पुण्यात अनेकदा दिसून येतात. भिडे पूल आणि जोशी पूल या ठिकाणी तर अशा घटना वारंवार दिसून येत असतात. अशीच एक घटना काल रात्री १ वाजून ४६ मिनिटांच्या दरम्यान घडली. पालघरहून एक कुटूंब राखीपौर्णिमेसाठी पुण्यात आले होते. हे कुटूंबीय मध्यरात्री या भागातून जात होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने कार वाहून जाऊ लागली. या कारमध्ये लहान मुलासह एकूण पाच जण होते.
चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने हा प्रसंग ओढावला. त्या परिसरात उपस्थित असलेल्या काही जणांच्या हे लक्षात येतात त्यांनी पोलिस स्टेशनला फोन करत याविषयी माहिती दिली. लगेचच एरंडवणा पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रोप, लाइफ जॅकेटच्या साहाय्याने नदीपात्रात उतरुन या जवानांनी कारमधील पाचही जणांना कारबाहेर काढले. सर्वजण आता सुखरुप आहे.
ही कार पालघरची असून राखीपौर्णिमेसाठी ते पुण्यात नातेवाईकांकडे आले होते. रजपूत विटभट्टीकडून ते पात्रातील रस्त्याने जात होते. त्यांची कार गरवारे पुलाखाली अडकली होती. एरंडवणा, जनता वसाहत सेंट्रल फायर स्टेशनची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळू शकली.
या पाच जणांमध्ये लहान बहिण – भाऊदेखील होते. कर्मचाऱ्यांनी एक एकाला बाहेर काढल्यानंतर बहिणीकडून भावाचा शोध घेतला जाऊ लागला. मेरा भाई किधर है, मुझे उसके पास जाना है.. म्हणत ती कर्मचाऱ्यांनी विनवणी करत होते. तितक्यात पोलिसांच्या कडेवर तिचा भाऊ तिला दिसला आणि दोघेही एकमेकांना बिलगले. या प्रसंगामुळे भावा – बहिणीची एकमेकांप्रती ओढ दिसून आली.
Pune Midnight Rescue Operation Car Drowned