पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे शहराला एक सुसंस्कृत नगरी म्हणून वारसा लाभलेला आहे. परंतु या शहरात देखील काही वेळा अत्यंत घृणास्पद आणि लाजिरवाणे प्रकार घडतात. असाच एक प्रकार आता उघडकीस आला आहे. एका महिलेला तिच्या सासऱ्याच्या समोरच तिच्या नातेवाईकांकडून मारहाण करीत चक्क लघवी पाजण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसगाव येथील एका महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, महिला तिच्या सासऱ्यासोबत त्यांच्या चुलत सासऱ्यांच्या घरी गेली. आम्हाला शिवीगाळ का करतात, असा जाब तिने विचारला. याचा राग आल्याने चुलत सासरे आणि चुलत दीर आणि घरातील कुटुंबियांनी त्या महिलेला व तिच्या सासऱ्याला मारहाण केली. लाथा-बुक्क्यांसह लाठ्या- काठ्याांनी ही मारहाण झाल्यावर हा प्रकार थांबला नाही. तर, एकाने बाटलीमध्ये लघवी जमा करुन ती महिलेला पाजण्याचा प्रयत्न केला. अखेर महिला व तिच्या सासऱ्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर याप्रकरणी हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांंनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.