पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संजय राठोड यांच्यावर आरोप असणाऱ्या तरुणीचा मृत्यू हा अपघात किंवा आत्महत्या असल्याचा अहवाल पुणे पोलिसांनी दिला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर टीकेची झोड उठली. या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांच्याशी संबंधित वादग्रस्त प्रकरणावर पोलिसांनी माहिती दिली आहे. यासंबंधीचा अहवाल पोलिसांनी सादर केला आहे.
पुणे पोलिसांनी दि. ८ जून रोजीच संबंधित तरुणींच्या मृत्यूच्या कारणाचा अहवाल दिला होता. या प्रकरणी राठोड यांच्यांवर कोणताही गुन्हा दाखल नाही. तर दुसरीकडे संबंधित तरुणीच्या मृत्यूची वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद आहे, पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात तरुणीचा मृत्यू हा अपघात किंवा आत्महत्या असल्याचे समोर आले असून पोलिसांनी आपल्या अहवालात तसे नमूद केले आहे.
संबंधित तरुणीच्या नातेवाईकांनी मात्र यावर संताप व्यक्त केला आहे. पोलीस तुमचेच आहेत. त्यामुळे क्लीनचिट देणारच, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे, तर संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने शिंदे गट आणि भाजपामध्ये वादाची नवी ठिणगी पडली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी जाहीरपणे संजय राठोड यांना विरोध केला असून पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाणे हे अत्यंत दुदैवी असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपला लढा सुरु राहणार असल्याचंही सांगितलं आहे.
चित्रा वाघ यांच्या टीकेला संजय राठोड यांनी उत्तर दिलं आहे. “लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. चित्रा वाघ यांना माहिती नसावं. त्यांना कागदपत्रं पाठवण्याची व्यवस्था करु. पोलिसांनी निष्पक्ष चौकशी केली आहे. न्यायव्यवस्थेवर आणि पोलिसांवर विश्वास असल्याने मी आतापर्यंत शांत होतो. सर्व सत्य बाहेर आलं आहे. मी नको ते भोगलेलं आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, माझाही परिवार आहे, पत्नी आहे, मलाही मुलंबाळ आहेत, वयस्कर आई-वडील आहेत. एखाद्याला किती त्रास होतो याचा आपणही विचार केला पाहिजे. मी चार वेळा मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलो आहे. तसं असतं तर जनतेने मला निवडून दिलं नसत, असे संजय राठोड म्हणाले आहेत. आत्तापर्यंत मी शांत होतो, पण असेच सुरु राहिले तर मी कायदेशीर मार्ग अवलंबणार, नोटीसही देणार, असा इशारा संजय राठोड यांनी यावेळी दिला.
तसेच माझ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी दाखल झालेली याचिका पुणे कोर्टाने दोन वेळा फेटाळून लावली होती. माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही, कोणतीही तक्रार नाही. तरीही आरोप झाले म्हणून चौकशी करण्यात आली. त्यानतंर मी मंत्रीपदावरुन बाजूला झालो होते. याप्रकरणी निष्पक्षपणे चौकशी झाली आहे, असा त्यांचा दावा आहे. लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. पण आपण काय बोलत आहोत याचं भान हवं. मीदेखील जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे यापुढे कोणी काही बोललं तर मी कायदेशीर कारवाई करणार”, असं ते म्हणाले.
तर दुसरी कडे संबंधित तरुणी पूजा चव्हाण हिची आजी शांताबाई राठोड यांनी कालच याविषयी संताप व्यक्त केला होता. शिंदे सरकारकडून पूजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र तसे काहीही झाले नाही. पोलिसांनी क्लीनचिट दिली. हे क्लीनचिट देणारे पोलीस तुमचेच आहेत. त्यामुळे वेगळे काही घडण्याची अपेक्षा नाहीच, असे त्या म्हणाल्या होत्या.
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, एक खुनी व्यक्ती या सरकारमध्ये नेतृत्व करत आहे. आम्हाला शरम वाटते, मात्र तुम्हाला का नाही वाटत, असा सवालही त्यांनी केला आहे. एक पूजा नाही तर अशा लाखो पूजा चव्हाणचा बळी घेतले जात आहेत. तो मंत्री असो की संत्री… पूजाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत. शेवटच्या क्षणापर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे. जिथे न्याय मागायला गेलो, तोच गळा दाबायला निघाला आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांनीही संजय राठोड यांची पाठराखण करत आधीच्या सरकारवर टीका केली आहे
Puja Chavhan Death Minister Sanjay Rathod Pune Police Report