इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा त्रास कमी करण्याच्या दिशेने सरकार वेगाने वाटचाल करत आहे. खासगी आस्थापना आणि संस्थांमधील कर्मचाऱ्यांनाही नजीकच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे निवृत्ती दिवसापासून पेन्शन मिळणार आहे. यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) शुक्रवारी लुधियानामध्ये ‘विश्वास’ हा पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे.
या विश्वास प्रकल्पांतर्गत लुधियाना येथील क्षेत्रीय कार्यालयात एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम कर्मचाऱ्यांची कागदपत्रे सेवानिवृत्तीच्या दोन महिने अगोदर पूर्ण करेल, त्यामुळे त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन प्रमाणपत्र दिले जाईल. एप्रिलमध्ये निवृत्त होणाऱ्या ५४ आस्थापनांतील ९१ कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पेन्शन प्रमाणपत्र देण्यात आले. यापैकी सात जणांनी स्थगित पेन्शनचा पर्याय निवडला आहे, तर ८४ जणांनी पेन्शनचा पर्याय निवडला आहे. तो यशस्वी झाल्यानंतर इतर राज्यातही सुरू केला जाईल.
EPFO चे अतिरिक्त केंद्रीय आयुक्त (ACC) कुमार रोहित यांनी सांगितले की, आस्थापनांना निवृत्तीच्या महिन्यासाठी भविष्य निर्वाह निधी (PF) चे आगाऊ पेमेंट करावे लागेल. पेन्शनचे दावे पीएफ कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह दाखल करावे लागतात. महिन्याच्या १५ तारखेपूर्वी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ECR (इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न) भरावे लागेल.
यादरम्यान, EPFO चे अतिरिक्त केंद्रीय आयुक्त (ACC) कुमार रोहित म्हणाले की, आझादीच्या अमृत महोत्सवात ‘प्रयास’ ते ‘विश्वास’ या दृष्टिकोनात क्रांतिकारक बदल होत आहे. EPFO मध्ये असे बदल पहिल्यांदाच केले जात आहे, त्यामुळे व्यावहारिक समस्या समजून घेण्यासाठी लुधियानामध्ये एक पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर इतर ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे.