मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ पत्रकार आणि राष्ट्रवादी मासिकाचे संपादक डॉ. सुधीर भोंगळे यांनी पवारांच्या काही निवडक भाषणांचे संकलन केलेले ‘नेमकचि बोलणें’ या ग्रंथाचे प्रकाशन आज वरळी येथील नेहरु सेंटरमध्ये उत्साहात पार पडले. १९८८ ते १९९६ या काळात केलेल्या ६१ भाषणांचा संग्रह ‘नेमकचि बोलणें’ या ग्रंथात करण्यात आला आहे.
या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते खासदार संजय राऊत, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर, ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर, ज्येष्ठ कवी किशोर कदम, लेखिका मनस्वीनी लता रविंद्र, अभिनेत्री चिन्मयी सुमित, अभिनेता संदीप मेहता, सामाजिक कार्यकर्ते शंभू पाटील, कार्यक्रमाचे निमंत्रक आणि पक्षाचे कोषाध्यक्ष माजी आमदार हेमंत टकले, पुस्तकाचे लेखक डॉ. सुधीर भोंगळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
तर उपस्थितांमध्ये खासदार शरद पवार, प्रतिभाताई पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार फौजिया खान, खासदार वंदना चव्हाण, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रा. हरी नरके, सुधींद्र कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदी उपस्थित होते.
यावेळी पवार यांच्या काही निवडक भाषणांचे अभिवाचन पत्रकार अनंत बागाईतकर, कवि किशोर कदम, लेखिका मनस्विनी लता रविंद्र, अभिनेत्री चिन्मयी सुमित, कलाकार संदीप मेहता आणि शंभू पाटील यांनी केले. लेखक डॉ. सुधीर भोंगळे यांनी आपल्या मनोगतात पवार यांच्या भाषणाचा हा पहिला खंड आहे. माझ्याकडे त्यांच्या भाषणांचा समावेश असलेल्या जवळपास ४०० ते ५०० डायऱ्या आहेत. पूर्वी नेते जी भाषणे करत असत ती भाषणे मी जशीच्या तशी लिहून घेत असे. या ग्रंथात ६१ भाषणे आणि ५१२ पाने असल्याचे सांगितले. यापुढील काळात उर्वरीत भाषणाचेही खंड प्रकाशित करु, असेही स्पष्ट केले. तर या कार्यक्रमातील मान्यवरांचे स्वागत माजी आमदार हेमंत टकले यांनी केले. सुधीर भोंगळे यांनी पहिल्या खंडासाठी जो कालखंड निवडला त्या काळात पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते. देशाचे केंद्रीय सरंक्षणमंत्री होते. तसेच देश आणि महाराष्ट्र एका महत्त्वाच्या वळणावरुन जात होता. त्याकाळात पवार यांच्या उद्धृत केलेले महत्त्वपूर्ण विचार पुढच्या पिढीपर्यंत जात असल्याबद्दल हेमंत टकले यांनी समाधान व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हणून पवार यांचा उल्लेख करतो त्यावेळी त्याचा अर्थ यशवंतरावांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ज्या प्रकारच्या भावी महाराष्ट्राचे चित्र आपल्या मनात रंगवलं होते त्या चित्रानुसार या राज्याला… या समाजाला… या राज्यशकटाला दिशा आणि गती देण्याचे काम गेल्या ४०-४५ वर्षात पवार यांच्या नेतृत्वाने केले असे उद्गार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावेळी काढले.
याशिवाय पवार यांच्या भाषणाचा ‘नेमकचि बोलणें’ हा ग्रंथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देऊन ‘नेमकचि बोलणें’ म्हणजे काय हे फोड करून सांगू असा टोला खासदार संजय राऊत यांनी यावेळी लगावला. डॉ. सुधीर भोंगळे यांनी हा ग्रंथ लिहून पुढच्या पिढीसाठी ऐतिहासिक काम करुन ठेवले आहे असेही संजय राऊत म्हणाले.यावेळी संजय राऊत यांनी तुमच्या विचाराला भगवं कव्हर घातलंय. तुम्ही जो महाविकास आघाडीचा ग्रंथ निर्माण केलाय त्याबद्दल पवार यांचे आभार मानले.