नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनावर मात करणाऱ्या अनेक पालकांच्या घरात एक वेगळीच समस्या दिसून येत आहे. कारण, पालकांना झालेल्या कोरोनाचे मुलांवर दुष्परिणाम दिसून .येत आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते ही अतिशय गंभीर बाब आहे. कोरोनाचा दुष्परिणाम म्हणून मल्टीपल सिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (MIS-C) म्हणजेच अनेक अवयवांच्या कार्यावर परिणाम करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या आरोग्य समस्येचा विळखा काही अपवाद वगळता, ३ ते १० वयोगटातील मुलांमध्ये अधिक दिसून येत आहे.
बिहारची राजधानी पाटण्यामध्ये या आजाराने ग्रस्त अनेक मुले समोर आल्याने ही माहिती देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. मल्टीपल सिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमने ग्रस्त सुमारे ७० मुलांना पोस्ट कोरोना साइड इफेक्टमुळे पटनाच्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. याशिवाय जन्मापासूनच या आजाराने ग्रस्त असलेल्या तीन बालकांना महावीर वात्सल्य या पटनामधीलच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इतर मोठ्या रुग्णालयांमध्येही अशा आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांची मोठी संख्या दिसून येत आहे. एम्स पाटणा येथील बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. लोकेश तिवारी म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून MSI-C ग्रस्त सुमारे ७० मुलांना कोरोनामुळे दाखल करण्यात आले आहे. या सर्वांचे वय तीन ते दहा वयोगटातील होते.
४१ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ
नुकतीच एक अनोखी घटना समोर आली आहे ज्यात तीन वर्षांची मुलगी ४१ दिवस व्हेंटिलेटरवर होती. मुलीच्या फुफ्फुसांना ७५ टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. आई – वडिलांना कोरोना झाल्यानंतर तिला संसर्ग झाला आणि कोरोना झाल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार तिला जाणवू लागली. या आजारात एकापेक्षा जास्त अवयव निकामी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर सात दिवस नॉन-इनवेसिव्ह व्हेंटिलेटरवर ठेवले. ४१व्या दिवशी, मुलीला शुद्ध आली आणि व्हेंटिलेटर काढताच तिने खेळायला सुरुवात केली. तिच्यावर केलेले उपचार यशस्वी झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला.