नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्षातील वाद काही केल्या थांबत नसल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, हा वाद दिवसेंदिवस वाढतच आहे. आता तर हा वाद आणखीनच वाढला आहे. कारण, निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला दिलेल्या संधीत मोठी गोठी निर्माण झाली आहे. कारण, शिंदे आणि ठाकरे गटाने आपल्या पक्षाचे नाव आणि चिन्ह याची सारखीच निवड केली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे आणि ठाकरे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास बंदी घातली आहे. म्हणजेच, आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले आहे. तसेच, आज दुपारी १ वाजेपर्यंत दोन्ही गटांनी त्यांच्या पक्षाचे नाव आणि निशाणी बाबत स्पष्टीकरण द्यावे, असे आयोगाने सांगितले आहे. त्यासाठी दोन्ही गटांनी तीन निशाणी आणि तीन नावे द्यायचे आहेत. मात्र, आता दोन्ही गटांनी सारखीच निशाणीची निवड केली आहे.
ठाकरे आणि शिंदे गटाने त्यांचे नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाकडे सादर केले आहे. यामध्ये खूपच साम्य असल्याचे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरे गटाने मशाल, त्रिशूळ आणि उगवता सूर्य या तीन चिन्हांपैकी एक चिन्ह देण्याची मागणी केली आहे. तर शिंदे गटानेही त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा ही चिन्हे मागितली आहेत. आता या दोन्हीत फक्त गदा आणि मशाल ही दोनच चिन्हे वेगळी आहेत. त्यामुळे आयोगाकडून ठाकरे गटाला मशाल तर शिंदे गटाला गदा हे चिन्ह मिळण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, दोन्ही गटांनी दिलेल्या नावांध्येही साम्य आहे. उद्धव ठाकरे गटाने आपल्या पक्षासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी तीन नावे दिली आहेत. तर शिंदे गटानेही बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि आनंद दिघे यांचे नाव मागितले आहे. आता या साम्यामुळे दोन्ही गटात नवीन वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. निवडणूक आयोग आता यावर काय निर्णय घेतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Politics Shivsena Thackeray and Shinde Group name Symbol Demand