मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे गटामध्ये विविध हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी गोठविण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाचे नाव काय असावे आणि निशाणी कोणती घ्यावी यावरुन खलबते सुरू आहेत.
पक्षाचे चिन्ह शिंदे गटाला स्वतः निवडता येणार नाही, तर निवडणूक आयोगाने काही चिन्हांची यादी दिली आहे. त्यातील तीन चिन्हे निवडायची आहेत. शिंदे गट कदाचित तलवार किंवा ढाल तलवार या चिन्हासाठी आग्रही राहण्याची शक्यता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेच्या अनेक पोस्टर, फोटो, फलक आणि नामफलकावर असलेला वाघ (ढाण्या वाघ) याचे तोंड किंवा मुखवटा हे चिन्ह हवे आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या अधिकृत चिन्हांच्या यादीत हे चिन्हच उपलब्ध नाही. त्यामुळे आता अन्य पर्यायांचा शोध सुरू झाला आहे. त्याशिवाय बंदूक हा देखील पर्यायाचा विचार सुरु आहे.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा सुरूवातीच्या काळात तो अधिकृतपणे राजकीय पक्ष नव्हता तर एक सामाजिक संघटना किंवा राजकीय दबाव गट म्हणून कार्यरत होता. कालांतराने वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने आपले उमेदवार उभे केले. तेव्हा निवडणुका लढवताना शिवसेनेला अधिकृत निवडणूक चिन्ह मिळलेले नसल्याने अन्य वेगवेगळ्या चिन्हांवर लढवल्या होत्या. त्यात कप बशी, ढाल तलवार, इंजिन अशी काही चिन्ह मिळाली होती.
१९८९ मध्ये शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले होते. तेव्हापासून शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी आपले उमेदवार कोणत्याही निवडणुकांच्या रिंगणात उतरले की, धनुष्यबाणाचा ते गर्वाने उल्लेख करत असत. मात्र अनेक निवडणुकीसाठी शुभ संकेत ठरलेले धनुष्यबाण हे चिन्ह सध्या तरी इतिहास जमा किंवा गोठवले गेले असून पर्याय म्हणून दुसरे चिन्ह मिळणार आहे.
वास्तविक पाहता भारतीय राजकारणात एखादे निवडणूक चिन्ह गोठवण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हे, तर काँग्रेसचे गाय वासरू हे चिन्ह अशाच प्रकारे गोठविण्यात आले होते. काँग्रेसच्या दोन्ही गटांना वेगवेगळे चिन्ह देण्यात आले होते. त्याचप्रमाणे समाजवादी पक्षाचे विविध गट, जनता दलाचे गट, द्रमुक आदि पक्षांच्या बाबतीतही निवडणूक आयोगाने अशीच भूमिका घेतली होती, असे दिसून येते.
खरे म्हणजे शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास घातलेली बंदी ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे असे सांगण्यात येते मुंबईतील अंधेरी पूर्व येथे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक होत असून यासाठी दोन्ही पक्ष शिवसेना पक्षाच्या दोन्ही गटांना नियमावली जाहीर करण्यात आली आहे, त्याचे पालन करणे त्यांच्यासाठी बंधनकारक असणार आहे.
Politics Shivsena Eknath Shinde Party Name Symbol