मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात येत्या पंधरा दिवसांमध्ये मोठा स्फोट होणार असल्याचा दावा गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे. त्यात आता खुद्द शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हेच संकेत दिले आहेत. मात्र एक स्फोट राज्यात आणि एक स्फोट केंद्रात होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
एकीकडे अजित पवार यांच्या हालचालींमुळे सर्व दावे खरे ठरण्याची शक्यता महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राजकारणात दोन मोठ्या घडामोडी होणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यातील राज्यात तर दुसरी दिल्लीत घडणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. देशभरात भाजपविरोधी संघटन बळकट करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपविण्यात आली आहे असे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या कन्येनेच हा दावा केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी भाई जाणार आणि दादा येणार, असे म्हटले होते. तर काही दिवसांपूर्वी आरटीआय कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पंधरा दिवसांनी महाराष्ट्राचे नेतृत्व बदलणार असल्याचा दावा केला होता. राजकारणातील दावे-प्रतिदावे सुरू असताना या साऱ्या चर्चांचे केंद्र अजित पवार आहेत. त्यामुळे त्यांनी अचानक दौरा बदलणे, बैठका रद्द करणे किंवा नियोजित कार्यक्रम रद्द करणे या साऱ्या गोष्टी प्रत्येक दावा खरा ठरण्याच्या दृष्टीने वाटचाल करणाऱ्या आहेत.
अजितदादा सर्वांनाच आवडतात
अजित पवार भाजपमध्ये जाणार का असा सवाल सुप्रिया सुळे यांना केला असता त्यांनी कष्ट आणि मेहनत करणारा नेता असल्यामुळे अजितदादा सर्वांनाच आवडतात, असे म्हटले आहे. पण ते भाजपमध्ये जाणार की नाही याबाबत त्यांनाच विचारा. त्याबद्दल काहीच माहिती नाही. मला गॉसिपिंगला वेळ नाही. माझ्याकडे खूप कामं आहेत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
अजित पवारांचे वेळापत्रक बदलले
दोन दिवसांपूर्वी नागपुरातील वज्रमुठ सभेला उपस्थित राहिल्यानंतर अजित पवार यांनी १७ एप्रिलचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले. त्यानंतर मंगळवारी ते शरद पवार यांच्यासोबत पुण्यातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. पण तो कार्यक्रमही त्यांनी रद्द केला. त्यामुळे अधिकच चर्चा रंगू लागली आहे.
समर्थक आमदारांची बैठक
दरम्यान, अजित पवार यांनी समर्थक आमदारांची मुंबईत बैठक घेतली आणि त्याबद्दल चुप्पीही साधली. त्यामुळे साऱ्याच चर्चांना बळ मिळाले. पण, राजकीय चर्चांवर पडदा टाकण्यासाठी अजितदादांनी ट्वीट करून आपण सोमवारी महाराष्ट्र भूषण सोहळ्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि मंगळवारी मी पूर्णवेळ विधान भवनातील कार्यालयात कामकाज करतोय, अशी माहिती दिली.
Politics NCP Leader MP Supriya Sule Indications