मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मविआ अर्थात महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ कोण, यावरून वक्तव्यांची चौफेर फटकेबाजी सुरू असतानाच ही आघाडी येत्या विधानसभा निवडणुका एकत्रच लढणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. अगदी ‘तू स्टॅम्प पेपर आण, मी लिहून देतो’, अशा शब्दांमध्ये त्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
शिवसेना गेल्यावेळी जिंकलेल्या १८ जागा लढवेलच शिवाय आणखी काही जागा मविआत मिळतील, असे विधान ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी केले होते. त्यावरून सध्या मविआत नाराजीनाट्य सुरू असल्याची चर्चा होत आहे. तर, तिन्ही पक्षांनी प्रत्येकी १६ जागा लढवाव्यात, असे अद्याप काहीही ठरले नसल्याचेही राऊत यांनी म्हटले.
विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून १६ जागांचं काहीही ठरलेलं नाही. सध्या केवळ उर्वरीत २५ जागांचा विषय असून २५ जागांच्या वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत एकत्रितपणे लढणार का, या प्रश्नावर अजित पवार यांनी स्पष्टच उत्तर दिले.
पवार म्हणाले की, मविआ १०० टक्के एकत्र राहणार आहे, तू स्टँप आण, मी लिहून देतो तुला. मी, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्याही सह्या करून देतो तुला, असे म्हणत अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलने महाविकास आघाडी एकत्रितपणेच निवडणुका लढवणार असल्याचे उत्तर पत्रकाराला दिले. अशा प्रकारच्या चर्चा चालत असतात, एक पक्ष असला तरी एकाच पक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा विचार करणारे नेते असतात. पण, यासंदर्भात अंतिम निर्णय हा त्या त्या पक्षाचे वरिष्ठ नेते करत असतात.
जागावाटप मेरिटनुसार
महाविकास आघाडीतील जागावाटप मेरिटनुसार होईल. सर्व बाजूंचा विचार करून जागा वाटप होईल आणि मेरिटवर निर्णय झाला तर अनावश्यक चर्चा थांबेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी म्हटले होते.
दोन हजाराच्या नोटा
देशात दोन हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काळा पैसा बाहेर काढण्याची भूमिका असताना देशातून हवालामार्फत साडेचारशे कोटी रुपये बाहेर जाण्याच्या बातम्या समोर येत आहेत, अशी टीका अजितदादा पवार यांनी केली. जर नोटाबंदी करायची होती तर ज्यांनी काळा पैसा साठवला आहे त्यासाठी सप्टेंबरपर्यंत मुदत द्यायची गरज नव्हती असेही अजितदादा म्हणाले.
समीर वानखेडे, तपास यंत्रणा
समीर वानखेडे यांच्या प्रकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनीही स्पष्टपणे याविषयी भूमिका मांडली. मात्र त्यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न झाला. आता जनतेसमोर सीबीआयच्या माध्यमातून सत्य बाजू येत आहे, असे अजितदादा यांनी सांगितले.
केंद्रीय आणि राज्यस्तरावरील यंत्रणांना चौकशी करण्याचा अधिकार आहे. अशा चौकशींवर अनेक सत्ताधारी पक्षामध्ये गेलेल्या आमदारांनी आणि खासदरांनी जे वक्तव्य केले आहेत ते जनतेने पाहीले. वास्तविक सत्ताधाऱ्यांकडून द्वेष भावानेने, राजकीय सूडबुद्धीने या चौकशीसाठी कोणाला बोलवता येऊ नये असे मत अजितदादांनी व्यक्त केले. अशा यंत्रणांच्या चौकशीसाठी कोणी गेल्यास त्यावर कोणतेही वक्तव्य माझ्याकडून करण्यात आलेले नाही. यापूर्वीही अनेक नेत्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले मात्र या गोष्टीतून काही लोक जाणीवपूर्वक वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. मात्र असा चौकशींवर मी कोणतेही वक्तव्य करत नाही, अशी स्पष्ट भूमिका अजितदादांनी माध्यमांसमोर मांडली.
त्र्यंबकेश्वर घटना
त्र्यंबकेश्वर घटनेसंदर्भात माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार हिरामण खोसकर यांच्याकडून माहिती घेतील. यापूर्वीही अकोला, अहमदनगर, औरंगाबाद याठिकाणीही दंगलीच्या घटना घडल्या. यामध्ये कोणीही भावनिक मुद्दा करू नये, राजकारण आणू नये, जातीजातीत तेढ निर्माण होऊ नये असे आवाहन अजितदादांनी केले आहे. स्थानिक लोकांनाही त्याविषयी आवाहन केले. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार असतात. सध्याचे गृहमंत्री याविषयी पाठपुरावा करत असले तरी ते नियंत्रणात येत नाही अशी टिपण्णी अजितदादा यांनी सरकारवर केली. अशा दंगलीमुळे गोरगरीब जनतेला त्याची किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक पोलिस प्रशासनाला योग्य कारवाई करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी अजितदादांनी केली.
कर्नाटक निकाल
काही लोकांना महागाई, बेरोजगारीचे लक्ष इतर ठिकाणी वळवण्यासाठी दुसरा मुद्दा मिळत नाही. परंतु आता कर्नाटकचा निकाल लागल्यानंतर सत्ताधाऱ्यांना भिती वाटत असावी. त्यामुळे जनाधार आपल्या बाजूने येण्यासाठी असा प्रयत्न काहींकडून होत असावा अशी शंका अजितदादांनी उपस्थित केली. आशिष शेलार यांनी गाईच्या हत्येच्या व्हिडीओ दाखवला. ही घटना कर्नाटकात घडल्याचा त्यांनी दावा केला. मात्र तो व्हिडिओ मणिपूरचा निघाला. अशाप्रकारे सत्ताधारी पक्षातील नेत्याने एकादा दावा करताना त्याची शहानिशा करणे आवश्यक आहे असे मत अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.
Politics NCP Leader Ajit Pawar Stamp Paper