विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट, नंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपशी जुळवून घेण्याची उद्धव ठाकरे यांना घातलेली गळ या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. विविध विरोधी पक्ष नेत्यांची भेट ते घेणार आहेत. दरम्यान, ही भेट पूर्वनियोजित असून त्याचे राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिले आहे.
शरद पवार यांच्या आजारपणावर मंध्यतरी छोटी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांना डॉक्टरांकडून विश्रांतीला सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे त्यांचे सर्व पूर्ननियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यानंतर प्रथमच ते दिल्ली दौर्यावर गेले आहेत. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांचे कार्यक्रम पूर्वनियोजित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौर्यावर आहेत. जयंत पाटील कार्यक्रमात व्यग्र आहेत, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी मराठा समाज आरक्षणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यादरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांची जवळपास अर्धा तास वैयक्तिक चर्चा केली होती. या भेटीत राजकीय चर्चा झाली का, राज्याच्या राजकारणात पुन्हा शिवसेना-भाजप युती होणार का, असे प्रश्न उपस्थित झाले होते.
मुख्यमंत्री-पंतप्रधान यांच्या भेटीच्या एका दिवसानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिले होते. ते पत्र रविवारी माध्यमांसमोर आले. केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेच्या नेत्यांना टार्गेट करून खोट्या प्रकरणात अडकवले जात आहे. तसेच राष्ट्रवादी, काँग्रेसच्या मंत्र्यांची कामे होतात, परंतु शिवसेनेच्या मंत्र्यांची कामे होत नाही, अशी तक्रार पत्रात केली होती. त्यामुळे भाजपसोबचे संबंध तुटण्याआधी भाजपशी जुळवून घ्यावे, असा सल्ला त्यांनी पत्रात दिला होता.