पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एका कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतल्याची घटना घडल्यानंत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबतही भयंकर प्रकार घडल्याची बातमी पुढे येत आहे. खुद्द अजितदादांनीच या घटनेचा खुलासा केला आहे.
ही घटना एवढी भयंकर होती की, अजित पवार अगदी थोडक्यात बचावले, असे म्हटले तर अतिरेक होणार नाही. शनिवारी बारामती येथील एका रुग्णालयाचे उद्घाटन केल्यानंतर अजित पवारांची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळली. या प्रकारानंतर लिफ्टचा दरवाजा तोडून अजित पवारांसह त्यासोबत असलेल्या डॉक्टरांना बाहेर काढावे लागले. या थरारक घटनाक्रमानंतर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘चौथ्या माळ्यावरून लिफ्ट कोसळली. मी बचावलो, नाही तर आज श्रद्धांजलीच वाहावी लागली असती, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
रविवारी एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी लिफ्टमध्ये घडलेला घटनाक्रम सांगितला. अजित पवार म्हणाले की, मला अकरा वाजेपर्यंत मुंबईत पोहोचायचे आहे. रात्री प्रवास केल्यानंतर कसे अपघात होतात? हे आपण पाहत आहोत. काल माझीही लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळली. याबद्दल काल मी कुठे बोललो नाही. तुम्ही घरचे आहात म्हणून बोलतोय,’ असे अजितदादा म्हणाले.
आणि लिफ्ट कोसळली
‘काल बारामतीत मी एका रुग्णालयाचे उद्घाटन केले. यावेळी लिफ्टमध्ये शिरल्यानंतर लिफ्ट बंद पडली. लिफ्ट वर जात नव्हती. तेवढ्यात लाईट गेले. लिफ्टमध्ये अंधार पडला आणि लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळली. खोटे नाही सांगत. पण, आज श्रद्धांजलीचाच कार्यक्रम झाला असता. सुरक्षारक्षकांनी दरवाजा तोडून आम्हाला बाहेर काढले. याबद्दल मी कुणालाच बोललो नाही. परमेश्वराची कृपा आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी बचावलो,’ असा खुलासा अजित पवारांनी केला.
Politics NCP Ajit Pawar on Life Experience After Supriya Sule