हो, पोलिसांनी केला चक्क पंतप्रधानांना दंड; असं काय केलं पंतप्रधानांनी?

ओस्लो (नॉर्वे) – देशाचे प्रमुख असलेल्या पंतप्रधानांनाच चक्क पोलिसांनी दंड केला असे कुणी तुम्हाला सांगितले तर विश्वास बसेल का? हो, पण, नॉर्वेमध्ये तसे घडले आहे. पंतप्रधानांनी असे नक्की काय केले की पोलिसांना दंड करावा लागला आणि पंतप्रधानांना हा दंड भरावा लागला. या घटनेची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. बघू या काय आहे हा प्रकार….
जगातील सगळ्याच देशात कोरोना महामारीचा प्रकोप सुरू आहे. प्रत्येक देश संसर्ग रोखण्यासाठी आपापल्या स्तरावर प्रयत्न करत आहे. लॉकडाउन लावण्यासारखे पावले उचलली जात आहेत. कोरोना रोखण्यासाठी लागू केलेल्या प्रतिबंधांचे उल्लंघन करणार्यांना दंड आणि कठोर शिक्षेची तरतूद आहे. कोरोना नियमांचे असेच उल्लंघन नॉर्वेच्या पंतप्रधानांनी केले. त्यामुळे पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांना नॉर्वे पोलिसांनी दंड ठोठावला.
एर्ना सोलबर्ग यांनी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबीयांना एकत्र जमवले होते. त्यामुळे एर्ना सोलबर्ग यांच्यावर कोविडच्या सोशल डिस्टन्सिंगचा नियम तोडल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असे नॉर्वेच्या पोलिसांनी सांगितले.
अशा प्रकरणांमध्ये दंड लावला जात नाही, परंतु पंतप्रधान निर्बंध लावण्यासाठी सरकारचे प्रतिनिधित्व करत आहेत त्यामुळे त्यांना दंड करण्यात आला. कायदा सर्वांसाठी समान आहे, परंतु कायद्याच्या नजरेत सर्व एकसारखे नाहीत, असे पोलिस प्रमुखांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या पतींनीसुद्धा कायद्याचे उल्लंघन केले आहे, पण त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. ज्या रेस्टॉरंटमध्ये वाढदिवस साजरा झाला, त्यांनीसुद्धा नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली नाही, असे पोलिसांनी सांगितले.
पंतप्रधानांनी मागितली माफी
पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणी अद्याप कोणतेच वक्तव्य केले नाही. गेल्या महिन्यात आपल्या ६० वा वाढदिवस साजरा करण्याबाबत पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी माफी मागितली होती. या कार्यक्रमात कुटुंबातील १३ सदस्य सहभागी झाले होते. दहापेक्षा अधिक लोक एकत्र येण्यावर नॉर्वे सरकारने निर्बंध घातले होते.