नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज, (रविवार, १८ डिसेंबर) मेघालय आणि त्रिपुराला भेट देणार आहेत. शिलाँगमध्ये ‘नॉर्थ ईस्टर्न कौन्सिल’च्या (ईशान्य परिषद) सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. सकाळी सुमारे 10:30 वाजता राज्य कन्व्हेन्शन सेंटर, शिलाँग येथे कौन्सिलच्या बैठकीला पंतप्रधान उपस्थित राहतील. त्यानंतर सुमारे 11:30 वाजता शिलाँगमध्ये एका जाहीर कार्यक्रमात ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील. त्यानंतर ते आगरतळा येथे प्रस्थान करतील आणि दुपारी सुमारे 2:45 वाजता एका जाहीर कार्यक्रमात विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
मेघालय दौरा
पंतप्रधान ‘नॉर्थ ईस्टर्न कौन्सिल’च्या (एनईसी) बैठकीला उपस्थित राहतील आणि संबोधित करतील. या परिषदेचे 7 नोव्हेंबर,1972 रोजी औपचारिक उद्घाटन झाले होते. एनईसीने ईशान्येकडील प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना आणि या प्रदेशातील सर्व राज्यांमधील इतर विकास उपक्रमांना पाठिंबा दिला आहे. एनईसीने विशेषतः शिक्षण, आरोग्य, क्रीडा, जलसंपदा, कृषी, पर्यटन, उद्योग, यासह अन्य महत्वाच्या क्षेत्रांमधील त्रुटी भरून काढण्यासाठी भांडवली आणि सामाजिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये मोलाचे सहाय्य केले आहे. यावेळी होणार्या जाहीर कार्यक्रमात, पंतप्रधान 2450 कोटीहून अधिक किमतीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. उमसावली येथे ते आयआयएम शिलाँगच्या नवीन आवाराचे उद्घाटन करतील.
या प्रदेशातील दूरसंचार कनेक्टिव्हिटीला (संपर्क सक्षमता) आणखी चालना देण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून, पंतप्रधान 4जी मोबाइल टॉवरचे लोकार्पण करतील, त्यापैकी 320 हून अधिक पूर्ण झाले आहेत, तर सुमारे 890 टॉवरच्या उभारणीचे काम सुरु आहे. ते शिलॉन्ग – डिएन्गपासोह मार्गाचे उद्घाटन करतील, यामुळे नवीन शिलाँग सॅटेलाइट टाउनशिपचा संपर्क सुधारेल आणि शिलॉन्ग मधील वाहतूक कोंडी कमी होईल. पंतप्रधान, मेघालय, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमधील अन्य चार महामार्ग प्रकल्पांचे देखील उद्घाटन करतील. ते मेघालय येथील मशरूम डेव्हलपमेंट सेंटर मधील स्पॉन प्रयोगशाळेचे उद्घाटन करतील, ज्यामुळे मशरूमचे उत्पादन वाढेल आणि शेतकरी आणि उद्योजकांना कौशल्य प्रशिक्षणही मिळेल. क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाचे अद्यायावतीकरण याद्वारे मधमाशीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे, यासाठी मेघालयमध्ये स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक मधमाशीपालन विकास केंद्राचे पंतप्रधान उद्घाटन करतील. याशिवाय, ते मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा आणि आसाममधील 21 हिंदी ग्रंथालयांचे उद्घाटन करतील.
आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमधील सहा रस्ते प्रकल्पांची पंतप्रधान पायाभरणी करतील. ते तुरा आणि शिलाँग तंत्रज्ञान उद्यान फेज-II येथे इंटिग्रेटेड हॉस्पिटॅलिटी आणि कन्व्हेन्शन सेंटरची पायाभरणीही करतील. तंत्रज्ञान उद्यान फेज-II जवळजवळ 1.5 लाख चौरस फुट क्षेत्रावर बांधण्यात आले आहे. ते व्यावसायिकांसाठी नवीन संधी उपलब्ध करेल आणि 3000 हून अधिक रोजगाराची निर्मिती करेल, अशी अपेक्षा आहे. इंटिग्रेटेड हॉस्पिटॅलिटी आणि कन्व्हेन्शन सेंटरमध्ये संमेलन केंद्र, अतिथी कक्ष, फूड कोर्ट इत्यादी सुविधा उपलब्ध असतील. ते पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि प्रदेशातील सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा प्रदान करेल.
त्रिपुरा दौरा
पंतप्रधान 4350 कोटी पेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रमुख उपक्रमांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील. प्रत्येकाकडे स्वतःचे घर असावे, हे सुनिश्चित करण्यावर पंतप्रधानांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या प्रदेशात हे सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, पंतप्रधान प्रधानमंत्री आवास योजना– शहरी आणि प्रधानमंत्री आवास योजना– ग्रामीण अंतर्गत लाभार्थ्यांसाठी गृह प्रवेश कार्यक्रमाचा शुभारंभ करतील. 3400 कोटींहून अधिक खर्च करून बांधण्यात आलेल्या या घरांचे 2 लाखांहून अधिक लाभार्थी आहेत. रस्ते जोडणीवर विशेष लक्ष केंद्रित करत हाती घेण्यात आलेल्या आगरतळा बायपास (खैरपूर-आमतली) एनएच-08 च्या रुंदीकरणाच्या प्रकल्पाचे पंतप्रधान उद्घाटन करतील. यामुळे आगरतळा शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होईल. पंतप्रधान, ते पीएमजीएसवाय III (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना) अंतर्गत 230 किमी पेक्षा जास्त लांबीच्या 32 रस्त्यांची आणि 540 किमी पेक्षा जास्त लांबीच्या 112 रस्त्यांच्या सुधारणा कामाची पायाभरणी देखील करतील. आनंदनगर येथील स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि आगरतळा शासकीय दंत महाविद्यालयाचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.
I look forward to visiting Meghalaya and Tripura tomorrow, 18th December, to take part in various programmes aimed at furthering the growth trajectory of these states and the entire Northeast region. https://t.co/XEEQPPFmHc
— Narendra Modi (@narendramodi) December 17, 2022
PM Narendra Modi Todya Meghalaya Tripura Tour Today