पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्रामपालिकेकडून वेळोवेळी कर भरण्याचे आवाहनासह नोटीसा बजावून देखील कर न भरलेल्या पिंपळगाव बसवंत शहरातील जागा भाडेसह गाळा भाडे थकवणाऱ्या नऊ व्यावसायिकांच्या दुकानास ग्रामपालिकेने शुक्रवार २४ रोजी सील करत दणका दिला. या वसुली मोहिमेत अवघ्या एका दिवसात ११ लाख २१ हजारांची वसुली करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
पिंपळगाव ग्रामपालिका अंतर्गत असलेल्या जागा भाडे व गाळा भाड्याच्या वसुलीसाठी ग्रामपालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहे. मार्च अखेरपर्यंत पाच कोटी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासन कामला लागले आहे. ग्रामपालिकेकडून सदर व्यवसायिकांना वेळोवेळी थकबाकी भरण्याबाबत आवाहनासह नोटिसा बजावून देखील व्यवसायिकांनी कर न भरल्याने ग्रामपालिकेकडून कर वसुली करिता शहरात धडक वसुली मोहीम राबविण्यात आली. यात गाळा भाडे, जागा भाडे न भरलेल्या नऊ व्यवसायिकांच्या दुकानास ग्रामपालिकेकडून सील ठोकीत टाळे लावण्यात येऊन कारवाई करण्यात आली. तर अन्य व्यवसायिकांकडून दुकान सिलची कारवाई टाळण्यासाठी जागेवरच पैसे भरून प्रशासनास सहकार्य केले. वसुली मोहिमेच्या पहिल्याच दिवशी गाळे धारकांकडून ११ लाख २१ हजाराची वसुली करण्यात आली आहे. कारवाईप्रसंगी पिंपळगाव ग्रामपालिकेच्या ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम, कर्मचारी भरत बनकर, बापूसाहेब डेरे,अभिजित काशीद, सुनील मोरे,सोनू बकुरे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
११ लाखांची वसुली…..
पिंपळगाव ग्रामपालिकेच्या माध्यमातून शहरात जागा भाडे, गाळे भाडे वसुलीकरीता फेरी काढून विशेष मोहीम राबविली जात आहे.थकबाकी न भरलेल्या व्यवसायिकांच्या दुकानास सील लावले तर विशेष मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ग्रामपालिकेने जवळपास ११लाख, २१हजारांची। कर वसुली केली आहे.
जनतेला आवाहन……
पिंपळगाव ग्रामपालिकेच्या वतीने शहरात ३१ मार्च पार्श्वभूमीवर विशेष कर वसुली मोहीम सुरू केली आहे. जागा भाडे, गाळाभाडे धारकांसह पिंपळगावकर नागरिकांनी घरपट्टी, पानीपट्टी कर भरून ग्रामपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपालिकेचे सरपंच भास्कर बनकर, उपसरपंच किशोर मोरे, व सदस्यांकडून करण्यात आले आहे.