इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ओटीटी प्लॅटफॉर्म सध्या भलतेच लोकप्रिय आहेत. मोठ्या पडद्यावरील चित्रपट हे काही काळाने हमखास ओटीटीवर येतातच. याशिवाय वेगवेगळ्या विषयांवरील वेबसिरीज देखील याच माध्यमातून दिसतात. त्यामुळे प्रेक्षकही यालाच पसंती देताना दिसतात. कोरोनाच्या काळात लागलेल्या लॉकडाऊनने लोकांना घरबसल्या मनोरंजनाचा पर्याय उपलब्ध करून दिला. कोरोनामुळे बाहेर कुठेही जायची भीती, बंदी. त्यामुळे सिनेमाही नाही नि नाटकही. शूटिंगच होत नसल्याने मालिका देखील पुढे सरकत नव्हत्या. अशावेळी तेव्हा फारसा प्रचलित नसलेला ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांना दिलासा देऊन गेला. आणि मग त्यानंतर तर तो त्यांच्या जगण्याचा अविभाज्य घटक झाला.
ओटीटीला मिळणारा प्रतिसाद पाहता त्यावरही अनेक ऑफर्स मिळू लागल्या. लोकं देखील एकाच्या अकाऊंटवर ४, ५ जणांनी लॉगइन करण्याचा किंवा एखाद्या वेबसिरीज पुरता पासवर्ड शेअर करू लागले. आता मात्र नेमकी यावरच बंदी घालण्यात येणार आहे.
नेटफ्लिक्स, अमेझॉन हे यातले लोकप्रिय प्लॅटफॉर्म. जर तुम्ही तुमचा नेटफ्लिक्सचा पासवर्ड तुमच्या कुटुंबीयांना किंवा मित्रांना दिला असेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. सध्या ओटीटीचा पासवर्ड सर्रास एकमेकांबरोबर शेअर केला जातो. त्यामुळे एकाच लॉग इन आयडीवर ४ ते ५ लोक त्या प्लॅटफॉर्मवरील कंटेंट पहात असतात. हे लवकरच बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लवकरच आता या पासवर्ड शेअरिंगवर बंधन येणार असल्याची माहिती आहे. एकाच अकाऊंटवर बरेच लोक कंटेंट बघत असल्याने ओटीटी कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळेच आता पासवर्ड शेअर करणं हा कायदेशीररित्या गुन्हा मानला जाऊ शकतो. अलीकडेच, सरकारच्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी कार्यालयाने पायरसी संदर्भात एक नवीन नियमावली तयार केली आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मचा पासवर्ड कोणासोबतही शेअर केल्यास तुमच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. ही गोष्ट केवळ नेटफ्लिक्सच्या बाबतीतच नव्हे तर सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी लागू होईल. हा नियम भारतात अजूनतरी लागू झाला नसला तरी तो ब्रिटनमध्ये लागू करण्यात आला आहे.
OTT Platform Password Sharing Punishment New Rule
Entertainment Internet Technology