नागपूर – कोरोना संकटामुळे बँकिंग फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये अनेक पटीने वाढ झाली आहे. कोविडमुळे ऑनलाइन व्यवहारांमध्ये तेजी आल्यामुळेही बँकिंग फसवणूक वाढली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) नागरिकांना सल्ला दिला आहे की, नेटबँकिंग किंवा मोबाईल बँकिंगसाठी मजबूत पासवर्ड तयार करा, तो हॅकर्ससाठी शोधणे सहज शक्य होणार नाही. एसबीआयने ग्राहकांना एक प्रकारे आपला पासवर्ड कसा मजबूत करायचा ते सांगितले आहे. त्यामुळे असे पासवर्ड तुमचे बँकिंग फसवणुकीपासून संरक्षण करतील.
कोविड -19 महामारी सुरू झाल्यापासून पाच हजारांहून अधिक महामारीशी संबंधित फिशिंग वेबसाइट्स उदयास आल्या आहेत. त्या बनावट पेमेंट ऑफर आणि सवलतीच्या कोविड चाचण्यांद्वारे ग्राहकांची माहिती चोरण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. गेल्या आठवड्यात समोर आलेल्या आणखी एका अहवालात म्हटले आहे की, भारतातील सुमारे 73 टक्के संस्था किंवा कंपन्यांना पुढील 12 महिन्यांत डेटा चोरीचा धोका आहे. अशा परिस्थितीत, ग्राहकांनी एक वेगळा आणि न सापडणारा बँकिंग पासवर्ड वापरणे फार महत्वाचे आहे.
भक्कम पासवर्ड कसा हवा, हे आपण आता जाणून घेऊ…
– पासवर्डमध्ये कॅपिटल आणि लहान अक्षरे समाविष्ट करा, जसे की aBjsE7uG
– पासवर्डमध्ये संख्या आणि चिन्हे दोन्ही वापरा, उदा. AbjsE7uG61!
– आठ पेक्षा कमी अक्षरांचा पासवर्ड तयार करू नका, उदा- aBjsE7uG
– बोलके शब्द वापरू नका. जसे कीबोर्ड पथ वापरू नका.
– 12345678 किंवा abcdefg सारखे सामान्य पासवर्ड तयार करू नका.
– अंदाज लावण्यास सोपे पर्याय वापरू नका.
– तुमच्या नावाचा आणि जन्मतारखेचा पासवर्ड लिंक करू नका.