मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भामटा नीरव मोदी म्हटल्यावर पंजाब नॅशनल बँक डोळ्यापुढे येते. या बँकेला तब्बल १४ हजार कोटी रुपयांनी लुटून देश सोडून पळून जाणारा नीरव मोदी भारतात प्रत्येकाला माहिती आहे. अनेकदा एखाद दुसऱ्या कागदपत्रासाठी बँकेचे कर्ज मिळत नसेल तर सर्वसामान्य माणूस सुद्धा ‘नीरव मोदीला कर्ज देताना विचार का केला नाही?’ असा टोमणा मारून जातो. याच नीरव मोदीच्या मुंबईतील मालमत्तांचा लिलाव गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेला आहे.
नीरव मोदीने मुंबईत राहून बँकेला गंडा घातला आणि नंतर भारतातून फरार झाला. पण त्याने घेतलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी त्याची मालमत्ता विकणं आवश्यक आहे. घर, बंगला, अॉफीस यांच्या लिलावासाठी डीआरटीने (कर्ज वसुली प्राधिकरण) वारंवार प्रयत्न केले, पण त्यांना ग्राहकच मिळाले नाहीत. अंधेरीत मरोळ येथे एचसीएल हाऊस हे नीरव मोदीच्या मालकीचे आहे. त्याची किंमत ५२ कोटी रुपये ठेवण्यात आली. २२ सप्टेंबरलाच या जागेच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली होती. पण ग्राहक मिळाला नाही म्हणून किंमत कमी करून लिलाव करण्याचा प्रयत्न डीआरटी करीत आहे. आता या मालमत्तेची किंमत ४० कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. पण केवळ याच नाही नीरव मोदीच्या मुंबईतील काही मालमत्तांच्या लिलावातही अश्याच अडचणी येण्याची शक्यता बळावली आहे. त्यांच्या लिलावाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
६६ कोटींचे ऑफीस
लोअर परळ येथे पेनिनसुला पार्कमध्ये नीरव मोदीचे कार्यालय आहे. विसाव्या मजल्यावरील त्याची दोन्ही कार्यालये लिलावासाठी काढण्यात आली आहेत. त्यांची किंमत ६६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. मफतलाल सेंटरमध्ये सहाव्या मजल्यावर असलेल्या कार्यालयाची किंमत ६२ कोटी रुपये ठरविण्यात आली आहे.
फोर बीएचके फ्लॅट
नीरव मोदीच्या नावाने पेडर रोड येथे फोर बीएचके फ्लॅटही आहे. या फ्लॅटच्या लिलावाची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. त्याचा लिलाव १० फेब्रुवारीला होणार असून किंमत १५ कोटी ८७ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
Nirav Modi Property Sell Buyer Poor Response